लक्ष्मण मोरे-
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील कचऱ्याचे प्रमाण प्रतिदिन जवळपास ४५० ते ५०० मेट्रिक टनांनी कमी झाले होते. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन १५०० ते १६०० मेट्रिक टनांच्या दरम्यान कचरा निर्माण होत होता. परंतु, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रस्त्यावरील कचऱ्यामध्ये वाढ होत चालली असून दिवसाकाठी १०० ते १२५ मेट्रिक टन कचरा दररोज वाढत आहे.पुणे शहरात दिवसाकाठी २ हजार ते २१०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा देणे बंधनकारक आहे. या कचऱ्यावर पालिकेकडून पूर्ण क्षमतेने प्रक्रिया केली जात आहे.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे नागरिक बाहेर पडू शकत नव्हते. तसेच, दुकाने, मॉल्स, सिनेमगृहे, हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, व्यापारी पेठा, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणांहून जमा होणारा कचरा पूर्णपणे बंद झाला. यासोबतच नागरिक घरातच बसून असल्याने ओल्या कचऱ्याचे प्रमाण मात्र प्रमाणात वाढले होते.
लॉकडाऊनच्या काळात घरोघर जाऊन कचरा गोळा करणारी स्वच्छ संस्थेची यंत्रणा आणि पालिकेची सफाई यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. सोसायट्या आणि घरांमधून जमा होणारा कचरा साधारणपणे १५०० ते १६०० मेट्रिक टनांच्या दरम्यान आहे. लॉकडाऊनच्या काळात याच दरम्यान कचरा निर्माण होत होता. त्यामुळे ४५० ते ५०० मेट्रिक टन कचरा कमी झाला होता. यातील १५० ते १८० मेट्रिक टन कचरा हॉटेल्समधून निर्माण होतो. पालिकेच्या २२ गाड्या हा कचरा एरवी गोळा करून प्रक्रियेसाठी पाठवितात. हॉटेल्स १०० टक्के बंद असल्याने हा कचरा येणेही बंद झाले होते. उर्वरित ३२० ते ३५० मेट्रिक टन कचरा हा कचरा बाजारपेठामधून निर्माण होणारा आणि रस्त्यावर टाकला जाणारा कचरा असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेचा घनकचरा विभाग भविष्यात हा कचरा रस्त्यावर येऊ नये आणि तो पालिकेच्या यंत्रणेद्वारे गोळा केला जावा यासाठी प्रयत्न करणार आहे. --------/-------शहरात दिवसाकाठी २ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. लॉकडाऊनच्या काळात तो ४५० ते ५०० मेट्रिक टनांच्या आसपास कमी झाला. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच नागरिक बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा प्रतिदिन १०० ते १२५ मेट्रिक टन कचरा रस्त्यावर येऊ लागला आहे. नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी हा कचरा रस्त्यावर न टाकता पालिकेच्या यंत्रणेला दिल्यास रस्त्यांवर स्वच्छता राहील.- ज्ञानेश्वर मोळक, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग--------/-------प्रतिदिन निर्माण होणारा कचरा - २,००० मेट्रिक टनप्रतिदिन लॉकडाऊनमधील कचरा - १५०० मेट्रिक टन-------/------प्रतिदिन कमी झालेला कचरा - ५०० मेट्रिक टनहॉटेल्समधून कमी झालेला - १५० ते १८० मेट्रिक टनरस्त्यावर टाकला जाणारा - ३२० ते ३५० मेट्रिक टन------/-------
रस्त्यावर जमा होणाऱ्या कचऱ्यामागील प्रमुख कारणे१. पालिकेच्या यंत्रणेद्वारे कचरा न देणे.२. रात्री-बेरात्री गुपचूप रस्त्यावर कचरा फेकणे३. पथारीधारक, दुकानदारांकडून टाकला जाणारा कचरा.४. खरेदीदारांनी रस्त्यावर कचरा फेकणे.५. नागरिकांमध्ये असलेला स्वयंशिस्तीचा अभाव.