कर्वेनगरमधून एक ओढा जातो. हा करिष्मा सोसायटीच्या शेजारी आहे. त्या ओढ्यात गेल्या काही दिवसांपासून बिअरच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या जात आहेत. त्या विषयी स्थानिक रहिवाशांनी हा प्रकार जवळच्याच दुकानातील कामगार करत असतील, असा आरोप केला आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या टाकलेल्या बाटल्या तशाच राहून पावसाळ्यात त्या पाण्यासोबत पुढे नदीपात्रात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच त्यांची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. पुणे शहरातून जाणाऱ्या मुठा नदीत अनेक ठिकाणी रिकाम्या बाटल्या टाकल्या जातात. त्यामुळेच पुढे त्या कवडी पाट येथील पुलाजवळ जमा होतात. दरवर्षी पावसाळ्यानंतर कवडी पाट येथे स्वच्छता मोहीम राबविली जाते. त्यामध्ये सर्वाधिक बिअरच्या बाटल्याच आढळून येतात. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या नदीलगत आणि ओढ्यालगत महापालिकेने योग्य लक्ष देण्याची गरज आहे.
ओढ्यामध्ये बिअरच्या बाटल्यांचा कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:10 AM