पुणे : शहरात कचरा करणे आणि कचरा जाळणे याला बंदी असून पालिकेकडून सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, पालिकेच्या मुख्य इमारतीसमोरच राजरोसपणे कचरा जाळला जात आहे. पालिकेसमोरील जयंतराव टिळक पुलाखाली नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला असून का कचरा जाळला जात आहे. त्यामुळे परिसरात धूर पसरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी कच-याचे वर्गीकरण न केल्यास तसेच घाण करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार नागरिकांनी ओला, सुका आणि जैविक कच-याचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. वर्गीकरण न करता कचरा दिल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. नियमांचे पालन केल्यास पहिल्यांदा ६० रुपये, दुस-यांदा १२० रुपये तर पुढील प्रत्येक वेळी १८० रुपये दंड करण्यात येत आहे.
रस्त्यावर कचरा करणे, सार्वजनिक ठिकाणांवर थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, उघड्यावर शौच करणे, पाळीव प्राण्यांना लघू शंका -शौचास नेणे, नाले-नदी-तलाव-घाटावर कचरा टाकणे आणि कचरा जाळणे असे प्रकार केल्यास दंड वसुली केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. परंतू, आयुक्तांच्या आदेशानंतरही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता तर पालिकेच्या इमारतीसमोरच कचरा जाळला जाऊ लागल्याने अधिकाऱ्यांच्या क्रयशक्तीविषयी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
कचरा जाळल्यानंतर त्यातून घातक वायू, बारीक कण हवेत पसरतात. ते श्वासावाटे आपल्या शरीरात जातात. त्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो.