पुणे : फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात निर्माण झालेल्या कचराकोंडीचे पडसाद महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. महापौरांनी कचरा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर काही सदस्यांनी याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. तर काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केवळ आरोप-प्रत्यारोप केले. गेल्या पाच दिवसांपासून कचरा डेपोला आग लागली असताना महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. तसेच अत्यंत अपुऱ्या सामग्रीच्या आधारे आग विझविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप योगेश ससाणे यांनी केला. तर ही आग कोणी लावली,याची आधी चौकशी करा व या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विशाल तांबे यांनी केली.गेल्या अनेक वर्षांपासून दर उन्हाळामध्ये येथील कचरा डेपोला आग लागते व त्यामुळे शहरात कचराकोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यासाठी कायमस्वरूपी उपयायोजना करण्याची आवश्यकता असताना प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे माजी महापौर वैशाली बनकर यांनी सांगितले. लँड फीलिंगमध्ये प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याची तक्रार दत्ता धनकवडे यांनी केली. पुणे शहराच्या कचरा डेपोसाठी नवीन जागा देऊ, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप काहीच निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे हेमंत रासने यांनी केल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्रकल्पांची जबाबदारी कोणावर निश्चित केली, असा सवाल उपस्थित केला. प्रवीण चोरबेले यांनी प्रत्येक सदस्यांनी आपल्या वॉर्डमध्ये एक तरी जागा कचरा प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे, असे म्हणाले. धीरज घाटे यांनी पीएमपीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी कचरा गाड्यांवरील ड्रायव्हर मागे घेतले, त्याला पर्यायी व्यवस्था काय केली, असा प्रश्न उपस्थित केला. कचरा डेपोच्या परिसरात हातभट्ट्यांचा धंदा सुरू असून, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भेट देऊन या हातभट्ट्या बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर देखील आज या हातभट्ट्या येथे सुरूच आहेत, असे सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. बाबूराव चांदेरे यांनी कचरा प्रश्नामध्ये कोणत्याही पक्षाने राजकारण आणू नये, असे सांगितले. कोथरूडकरांना कचऱ्याचा वास येतो, मग हडपसर परिसरातील लोकांना घ्राणेंद्रिय नाहीत का, असा सवाल चेतन तुपे यांनी उपस्थित केला. घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सहभागृहाला चुकीची माहिती दिली. डेपोची जागा बिल्डरांना मिळावी, यासाठी तो डेपो बंद करण्याचा घाट घातला जात आहे. पिंपरी सांडस येथील ५० एकर जागेच्या बदल्यात तुळापूर येथील जागा दिल्याचे ही त्यांनी सांगितले. कचरा प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यानंतरदेखील बहुमत असलेल्या भाजपाने विरोधकांना नोटीसा दिल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केला. (प्रतिनिधी)
कचरा डेपो आग, कोंडीबाबत सदस्यांच्या तीव्र भावना
By admin | Published: April 20, 2017 7:04 AM