दौंड : शहरातील भीमनगर परिसरातील दौंड-सिद्धटेक रस्त्यालगतच्या उघड्यावरील कचरा डेपोचा उपद्रव भीमनगरच्या रहिवाशांना होत असून, हा कचरा डेपो हलविण्यासंदर्भात येथील नागरिकांनी तीन तास रास्तारोको करीत आंदोलन केले. संतप्त आंदोलकांनी दौंड नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी यांना धारेवर धरले. कुठल्याही परिस्थितीत कचरा डेपो स्थलांतरित झाला पाहिजे. जोपर्यंत कचरा डेपो हालत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही या मागणीवर आंदोलक ठाम होते.शहरात गोळा केलेला कचरा नगर परिषदेमार्फत भीमनगर परिससरात उघड्यावर टाकला जातो. या परिसरात लोकवस्ती, शाळा असून सिद्धटेकच्या गणपतीच्या दर्शनाला याच मार्गाने भाविकांना जावे लागते. उघड्यावरील कचरा डेपोमुळे दुर्गंधी सुटते. कचरा ढिगाऱ्यावर मोकाट जनावरांचा संचार असतो. जनावरे सातत्याने कचरा विस्कटत असल्याने सर्व कचरा रस्त्यावर येतो अशी एकंदरीत परिस्थिती आहे.रहिवाशांनी वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाला कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी लेखी व तोंडी स्वरूपात तक्रारी केल्या. वेळोवेळी आंदोलनेदेखील केले. परिणामी, या भागातील रहिवाशांनी गेल्या वर्षी रास्ता रोको आंदोलन केल्यावर एक वर्षात कचरा डेपो हलविण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. त्याविरोधात रोष व्यक्त करीत भीमनगरच्या रहिवाशांनी रास्ता रोको करीत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान, खासदार, आमदार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा निषेध करण्यात आला.यावेळी अश्विन वाघमारे, अमोल सोनवणे, राजू जाधव, सुनील शर्मा, लक्षण कदम, पांडुरंग गडेकर, प्रकाश सोनवणे, मिलिंद यादव यांची भाषणे झाली. घटनास्थळी नगराध्यक्ष शीतल कटारिया, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, नायब तहसीलदार सचिन अखाडे, गटनेते राजेश गायकवाड, योगेश कटारिया, नगरसेवक शहानवाज पठाण, नगरसेवक जिवराज पवार, नगरसेवक गौतम साळवे उपस्थित होते. नगराध्यक्ष शीतल कटारिया म्हणाल्या की, कचरा डेपो हलविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तरीदेखील येत्या शनिवारी कचरा डेपोच्या प्रश्नावर विशेषसभा बोलावून यासभेचा वृत्तांत तसेच कचरा डेपो हलविण्याचा ठराव तातडीने जिल्हाधिकारी यांना पाठवून लवकरात लवकर कचरा डेपो हालविण्यासाठी हालचाली केल्या जातील असे सांगितले.पोलीस निरीक्षक सुनील महाडीक म्हणाले की, कचरा डेपो हलविण्यासाठी आंदोलकांनी कायद्याची लढाई सुरू करा. त्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने पाठीशी राहू असे त्यांनी सांगितले.>आम्ही ही माणसंच आहोत ना...भीमनगरमधील रहिवासी कचरा डेपोचा दुर्गंधीचा त्रास सोसत आहेत. शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. तेव्हा आंदोलनस्थळी विशेषत: महिला बोलत होत्या की ‘आम्ही माणसंच आहोत ना, जनावरं नाही’ याचे भान नगर परिषद प्रशासनाने ठेवावे.
कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:21 AM