पुणे : महापालिकेला कचरा डेपोसाठी स्वमालकीची जमीन देणा-या उरुळी देवाची-फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या मुलांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्री मंडळात आज मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. महापालिकेने सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला होता.एकूण ५७ युवकांना महापालिकेच्या नोकरीत सामावून घेण्यास मंजूरी मिळाली आहे. गेली अनेक वर्षे या ग्रामस्थांकडून ही मागणी करण्यात येत होती. त्यांच्या जागा घेताना महापालिकेने त्यांना असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर विविध कारणे देत त्याची अंमलबजावणी करणे टाळले जात होते. यापूर्वी महापालिकेने सुमारे ६२ जणांना महापालिकेच्या सेवेत घेतले आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मागणी केली जात होती. एकूण १५३ जागा महापालिकेने त्यावेळी संपादित केल्या होत्या. त्यांच्याकडून मागणी केली जात होती.ग्रामस्थांना दिलेले आश्वासन पूर्ण : बापटकचरा डेपोमुळे या परिसराचे सार्वजनिक आरोग्य बिघडले. जलस्रोत खराब झाले, त्यातून लहान मुले आजारी पडू लागली, अशी कारणे सांगत तीन महिन्यांपूर्वी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत कचरा डेपो बंद पाडण्याचे आंदोलन केले. त्यात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्याचवेळी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली.
कचरा डेपोसाठी पालिकेत नोकरी, फुरसुंगी-उरुळी देवाचीच्या तरुणांना मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 4:29 AM