पुणे : शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. १ स्पटेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत २४ हजार पुणेकरांवर कारवाई करून १ कोटींचा दंड वसूल केला आहे.
पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांस दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. त्यासाठी १८० रुपयापासून ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. २०२३ या वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल १ हजार २४८ लोकांकडून १२ लाख ४८ हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या ८५८जणांकडून १ लाख ८१हजार ६७० रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या १ हजार २६३ लोकांकडून ७ लाख ९ हजार१०० रु वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल २ हजार ०६४ लोकांकडून ४ लाख ३ हजार रुपये वसूल करण्यात आले.
घरगुती कचरा स्वच्छ च्या लोकांना देण्यास नकार देणाऱ्या ३८१ लोकांकडून १२ हजार ९४० रूपये वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ३० हजार १२९ लोकांकडून ९५ लाख ६५ हजार रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद बाबत ५३ लोकांकडून २ लाख ७५ हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या २९८ लोकांकडून १४ लाख ६५ हजार ६५० रूपये दंड वसुल केला आहे. ५४८ लोकांवर प्लास्टिक कारवाई करत २७ लाख ११ हजार वसूल करण्यात आले, अशा एकूण ३७ हजार १५२ लोकांवर दंड ठोठावत महापालिकेने १ कोटी ६६ लाख ३७ हजार ७२१ रुपये वसूल केले आहेत.
हडपसर क्षेत्रीय कार्यालय, नगर वडगावशेरी, कोंढवा येवलेवाडी, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने खूप चांगल्या पद्धतीने जनजागृती करत दंडात्मक कारवाई केली आहे. तर येरवडा कळस धानोरी, ढोले पाटील रोड, बिबवेवाडी अशा क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य असताना देखील मोठयाप्रमाणात कारवाई केली नाही.
शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाते. स्पटेंबर ते डिसेंबर या चार महिन्याच्या कालावधीत नागरिाकवर कारवाई करून १ कोटींचा दंड वसूल केला आहे.
- संदीप कदम, उपायुक्त्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग.