पुणे : पैसे न दिल्याने कचरा उचलला नाही. त्या रागातून एका कुटुंबाने ज्येष्ठ कचरा वेचक महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तिच्या अंगावर कुत्रा सोडल्याने तो चावला. जिन्यावरुन तिला खाली फरफटत ओढत आणल्याने ही महिला गंभीर जखमी झाली.
याबाबत लक्ष्मी दत्ता गायकवाड (वय ६५, रा. जय भवानीनगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुप्रिया संजय कांबळे (वय २३, रा. जय भवानी नगर, कोथरुड) व तिचा भाऊ व वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोथरुडमधील जयभवानीनगर येथे २२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घडली.
स्वच्छ संस्थेच्या वतीने शहरात घरोघरी जाऊन कचरा घेण्यासाठी महिलांची नेमणूक केली आहे. या कचरा वेचक महिलांना दरमहा ७० रुपये द्यायचे असतात. महापालिकेने तसा करार संस्थेशी केला आहे. मात्र, अनेक जण ७० रुपये वाचविण्यासाठी कचरा रात्री अपरात्री रस्त्याच्या कडेला टाकतात. अनेक जण पैसे देत नाही. कांबळे यांनी मागील तीन महिने पैसे दिले नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचा कचरा उचलला नाही. आरोपी सुप्रिया हिने फिर्यादी यांना कचरा का घेतला नाही, अशी विचारणा केली. तेव्हा पैसे देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. सुप्रिया हिने लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोक्यात, पाठीवर मारुन जखमी केले. सुप्रिया हिच्या भावाने कुत्रा अंगावर सोडल्याने तो फिर्यादीला चावून त्या जखमी झाल्या. सुप्रिया हिच्या वडिलांनी फिर्यादीस जिन्यावरुन खाली फरफटत ओढत आणले. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.