पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी महापालिकेस दिलेली मुदत संपण्यास अवघा एक महिना उरला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची झोप उडाली असून, गेल्या तीन महिन्यांत पालिकेस पर्यायी कचरा डेपोसाठी एक इंचही जागा मिळालेली नाही, तर एकही नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करता आलेला नाही. उलट एकीकडे शहरातील कचऱ्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना, दुसरीकडे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा सर्वाधिक १ हजार टन क्षमतेचा हंजर प्रकल्पही गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे महिनाभर आधीच शहरात कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झालेली आहे.गेल्या दोन वर्षांपासून या दोन्ही गावच्या ग्रामस्थांकडून डेपो बंद करण्यासाठी प्रत्येक सहा महिन्यांनंतर गाड्या अडविण्याचे आंदोलन केले जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीही ग्रामस्थांनी कचरा गाड्या अडविण्यास सुरुवात केली होती. या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करून महापालिकेतर्फे इतर ठिकाणी डेपो सुरू करण्यासाठी तसेच नवीन प्रकल्प उभारण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते. ही मुदत संपण्यास अवघे ३० दिवस उरले आहेत. (प्रतिनिधी)
कचराकोंडी; आता उरला फक्त महिना
By admin | Published: December 01, 2014 3:38 AM