खोडद : जुन्नर तालुक्यातील खानापूर जवळील वनक्षेत्रात सडलेले कांदे, मेलेली जनावरे, कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक आदी केरकचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने या वनक्षेत्रात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळू लागले आहे. या कचऱ्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून या प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर उपाययोजना करण्याबरोबरच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागली आहे.
मानमोडी डोंगररांगेच्या पायथ्याशी वनविभागाची वनजमीन आहे. या मानमोडी डोंगररांगेत भीमाशंकर लेणी समूह, अंबा अंबिका लेणी समूह, भूत लेणी समूह हे तीन बुद्धलेणी समूह आहेत. या लेण्यांकडे जाण्याचा मार्ग हा या वनक्षेत्रामधून आहे. या बुद्ध लेणी पाहण्यासाठी बाहेरून अनेक पर्यटक व अभ्यासक या ठिकाणी येत आहेत. पुरातत्त्व विभाग व वनविभागाने यांनी संयुक्तपणे बुद्धलेण्यांकडे जाणाऱ्या मार्ग स्वच्छ व सुरक्षित करावेत, ठिकठिकाणी माहिती फलक लावावेत व या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून पर्यटक व अभ्यासक करत आहेत.
या लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गात काचा, प्लॅस्टिक ग्लास, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि अन्य कचरा टाकला जात आहे. या ठिकाणी सडलेले कांदे देखील मोठ्या प्रमाणात टाकलेले आहेत. सडलेल्या या कांद्यांमुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. मेलेली जनावरे देखील या ठिकाणी आणून टाकली जातात .महत्त्वाची बाब म्हणजे लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गालगतच ही घाण टाकली जात असल्याने लेण्यांकडे जाताना अगदी सुरुवातीलाच ही घाण लक्ष वेधून घेते. या सर्व प्रकारामुळे बाहेरून येणारे पर्यटक व लेणी अभ्यासक नाराजी व्यक्त करत आहेत. पर्यटकांना सुरुवातीलाच लेणीच्या पायथ्याशी टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीला तसेच असुविधांना सामोरे जावे लागते. जुन्नरचा हा प्राचीन वारसा जगापुढे आणण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत, परंतु जुन्नर मध्ये आलेल्या पर्यटकांना या असुविधांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खानापूर जवळील मानमोडी डोंगररांगेत तीन लेणी समूह आहेत. हे लेणी समूह म्हणजे जागतिक कीर्तीचा असा वारसा आहे. पुरातत्त्व व वनविभागामार्फत येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून इकडे येणारे पर्यटक कसे वाढतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, पुरातत्त्व व वनविभागाकडून या परिसरात कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. बुद्धलेण्यांकडे जाणाऱ्या मार्गात जे अडथळे आहेत, त्याबाबत वनविभागाला निवेदन देणार आहोत.
- गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष, प्रबुद्ध भारत फाउंडेशन, जुन्नर
२३ खोडद
खानापूर वनक्षेत्रात टाकलेला कचरा.