पुणे: कसबा विधानसभा मतदार संघ पुण्याच्या मध्यवर्ती भागात येतो. कसबा कचरा मुक्त, ट्रॅफिक मुक्त आणि झोपडपट्टी मुक्त आम्ही करणार आहोत. सोसायटीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल बसविणे हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकाकासाठी मैदाने उपलब्ध करून देणार असल्याचे कसब्यातील उमेदवारांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न करणार
कसब्यात नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये सोसायटीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल बसविणे हा उपक्रम असेल. कारण भविष्यात पाणी, वीज हे प्रश्न गंभीर होऊ शकतात. शनिवार मैदान क्रीडा संकुल उभारण्यावर भर असेल. त्यातून अनेक खेळाडूंना ही जागा खेळायला उपलब्ध होईल. ज्येष्ठ नागरिकांचे वारसा जपणारे कट्टे तयार करणार. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी दवाखाना उभारणार. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आणि महिला भवन उभारणार. राजमाता जिजाऊ यांनी शिवबांना याच पुण्यभूमीत घडवले. त्यांचे संस्कारशिल्प साकारणार आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मध्यवर्ती भागात वाहनतळ उभे करण्यासाठी प्रयत्न करीन. शनिवारवाड्याच्या प्रांगणात भव्य वीर शिल्प आणि बाग तयार करणार. कसब्याला समृद्ध करणे हेच माझे व्हिजन असणार आहे. - रवींद्र धंगेकर, काँग्रेस (कसबा पेठ विधानसभा)
कचरा मुक्त, ट्रॅफिक मुक्त आणि झोपडपट्टी मुक्त कसबा करणार
कसबा हा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे कचरा मुक्त, ट्रॅफिक मुक्त आणि झोपडपट्टी मुक्त कसबा करणे हेच माझे व्हिजन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जुन्या वाड्यांचे पुनर्वसन करणे, नागरिकांचे प्रशस्त घरांमध्ये पुनर्वसन करणे, जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला चालना देणे, ऐतिहासिक वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामावरील निर्बंध हटविण्यासाठी पाठपुरावा करणे, वाहतूककोंडी मुक्त परिसर करणे, नागरिकांसाठी मोकळे पादचारी मार्ग, नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा, कसबा मतदारसंघातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेची जपवणूक, कसबा मतदारसंघात सीसीटीव्ही वाढवून भयमुक्त आणि सुरक्षित कसबा घडवणार आहे. कसब्याचा संपूर्णपणे विकास करणे हेच माझे व्हिजन असणार आहे. - हेमंत रासने, भाजप, कसबा पेठ विधानसभा.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदाने उपलब्ध करून देणार
पुण्यातील जुनी-पडझड झालेली घरे, विशेषतः कसबा पेठेतील जुन्या वाड्यांची दुरुस्ती आणि पुनर्विकास करणे अत्यावश्यक बनले आहे. या वाड्यांना पुनरुज्जीवित करून त्यांचे सुरक्षित आणि सुशोभित वस्तीत रूपांतर करणे हे आमचे मुख्य ध्येय असणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्थापनाचे उपाय करण्यात येईल. वाहतूक व दळणवळण यात अरुंद रस्ते आणि पडके वाडे अडथळे निर्माण करतात म्हणून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याला प्राधान्य दिले जाईल. लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. मात्र, मैदाने उपलब्ध नसल्याने मुले डिजिटल उपकरणे, मोबाइलकडे आकर्षित होत आहेत. त्यांच्या खेळासाठी सुरक्षित आणि सोयीची मैदाने उपलब्ध करून देणार आहे. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये गुन्हेगारीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून विविध रोजगार मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. - गणेश भोकरे, कसबा पेठ विधानसभा, मनसे