पुणे : नववर्षाच्या स्वागतालाही पालिकेकडून सारसाबागेसह सव्वाशे उद्याने उघडणार नाहीत. परंतु, खुल्या करण्यात आलेल्या उद्यानांमध्ये मात्र थर्टीफर्स्ट निमित्त काही निर्बंध लावणार असल्याचे उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये उद्यानेही बंद केली होती. राज्य शासनाने उद्याने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर दीड महिन्यांपूर्वी शहरातील ८१ उद्याने उघडली. परंतु, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई केली. तरीही हे नियम पायदळी तुडविले जात आहेत.
दिवाळीआधीच सारसबाग बंद केली होती. दिवाळीनंतर दुसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, अद्याप रुग्णसंख्या आटोक्यात आहे. त्यामुळे उद्याने उघडण्याची मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून होत आहे. परंतु, उद्यानांत ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा वावर दिसून येत असल्याने तूर्तास सर्व बागा-उद्याने उघडणे शक्य नाही, असा अभिप्राय महापालिकेच्या उद्यान खात्याने प्रशासनाला दिला आहे.