दौंड : शहरात एलपीजी गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारी पाच जणांच्या टोळीला गजाआड करण्यात दौंड पोलिसांना यश मिळाले आहे. त्यांच्याकडून दोन टेम्पो व गॅस सिलिंडर टाक्या व इतर साहित्यासह नऊ लाख रुपये रकमेचा माल जप्त करण्यात आला असून ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. मांगीलाल बिष्णोई (वय २०), कैलास बिष्णोई (वय ३६), हरीष बिष्णोई (वय ३२), भवरलाल बिष्णोई (वय ३२, सर्व रा. सिद्धीविनायक अपार्टमेंट, दौंड), विनोद सोनवणे (वय ३२, रा. निमगावखलू, ता. श्रीगोंदा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील यादव वस्तीच्या परिसरात एका मोकळ्या जागेत गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली होती. त्यानंतर घुगे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक हृषीकेश अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक राठोड, डी. जी. भाकरे, पांडुरंग थोरात, रवी काळे, एच. आर. भोंगळे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पाच जण दोन टेम्पोमध्ये भरलेले सिलिंडर खाली घेत होते. तर काही जण रिकाम्या सिलिंडर टाक्यांचे गॅस तोंडावरती लोखंडी पाईप बसवून भरलेले सिलिंडर टाकीमधून रिकाम्या सिलेंडर टाकीमध्ये गॅस भरत असताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ या पाचही जणांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात या पाचही जणांनी गुन्ह्याची कबुली दिली असून याबाबतची माहिती तहसीलदार संजय पाटील यांना कळवली आहे. पोलिसांनी दोन टेम्पो व गॅस सिलिंडर टाक्या व इतर साहित्यासह नऊ लाख रुपये रकमेचा माल जप्त करण्यात आला आहे. बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास तुकाराम राठोड करीत आहे.