वाघोली : हॉटेल व ढाब्यांसाठी बेकायदेशीरपणे गॅस एजन्सीकडून बिनदिक्कतपणे सुट्टीच्या दिवशीही काळ्याबाजाराने सिलिंडरची विक्री होत आहे. याबाबत पुरवठा विभाग व गॅस कंपन्या दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नागरिक करीत असले तरी घरगुती गॅस धारकांना सिलिंडरकरिता मनस्ताप सहन करावा लागत असून, बेकायदेशीरपणे हॉटेल व्यावसायिकांसाठी तात्काळ सुविधा पुरविल्या जात आहेत.घरगुती सिलिंडर घेण्याकरिता गॅस कंपन्यांनी आॅनलाईन बुकिंग केल्याशिवाय एजन्सीकडून सिलिंडर दिला जात नाही. तशा स्पष्ट सूचना देखील एजन्सीच्या बाहेर लावलेल्या आहेत. मात्र या सूचना फक्त घरगुती गॅस धारकांसाठीच असल्याचे चित्र वाघोली परिसरामध्ये पाहावयास मिळत आहे. हॉटेल, चायनीज सेंटर, स्वीट होमच्या दुकानदारांना बुकिंगशिवाय काळ्या दराने कोणत्याही दिवशी अतिशय बिनदिक्कतपणे सिलिंडरचा पुरवठा केला जात असल्याचा प्रकार घडत आहे. घरगुती गॅसधारकांना दुय्यम वागणूक आणि काळ्याबाजाराने सिलिंडर घेणाऱ्यांना विनाबुकिंग तत्पर सेवा गॅस एजन्सी देत असल्याच्या तक्रारी वारंवार नागरिकांकडून होत होत्या; मात्र पुरवठा विभाग आणि गॅस कंपन्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. याची शहानिशा करण्याकरिता बनावट ग्राहक म्हणून माध्यमांच्या प्रतिनिधींनी वाघोलीतील बी.के. एन्टरप्रायजेस या गॅस एजन्सीकडे हॉटेलकरिता चार गॅसची मागणी केली. त्यानुसार संबंधित कामगाराने ९०० रुपये दराने रक्कम मागितली व घरपोच गॅसवाहनातून तातडीने चार गॅस काढून ते माध्यमांच्या प्रतिनिंधींसाठी ठेवले. गॅस बुकिंग केले नसल्याचे व काळ्याबाजाराने अजून गॅस मिळतील का, अशी विचारणा केली असता, कर्मचाऱ्यांनी फक्त पैसा देदो गॅस मिलेगा असे सांगितले.
गॅस सिलिंडरचा काळाबाजार
By admin | Published: December 22, 2014 5:21 AM