पुणे : कर्वेनगरमध्ये समोसा कारखान्यात गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने त्यात चार कामगार भाजून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजता घडली.
कर्वेनगर येथील शालिनी कॉर्नर येथील भालके सदन या चार मजली इमारतीत तळमजल्यावर हा समोसा कारखाना आहे. तेथे २ गॅस शेगड्या आहेत. पहाटे चार कामगार तेथे काम करत होते. दोन्ही शेगड्या सुरु करुन त्यांनी बटाटे उकडण्यास सुरुवात केली होती. गॅस सिलेंडरला जोडलेल्या पाईप मधून गॅस गळती होत होती. हा गॅस शेगडीपर्यंत पोहचल्याने त्यातील एका शेगडीचा मोठा स्फोट झाला. यामुळे एक कामगार घरातून बाहेर फेकला गेला. त्या खोलीतील सर्व सामान विखुरले होते.
अग्निशामन दलाला याची माहिती मिळताच कोथरुड स्टेशनची गाडी घटनास्थळी पोहचली. तोपर्यंत नागरिकांनी स्फोटात जखमी झालेल्या चारही कामगारांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.