चाकण (पुणे) :चाकण-तळेगाव रस्त्यावर राणूबाईमळा (चाकण, ता. खेड) येथे एका दुमजली इमारतीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना बुधवारी (दि. २१) रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेत एका ज्येष्ठ महिलेचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला, तर इतर ८ जण जखमी झाले आहे. त्यापैकी एक तरुण गंभीररित्या भाजल्याने त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. इतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गॅस सिलेंडरचा स्फोट इतका मोठा होता की, घटनस्थळापासून अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत मोठा आवाज झाला. स्फोट झालेल्या इमारतीच्या भिंतीचा मोठा भाग लगतच्या पत्र्याच्या घरावर कोसळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राणूबाईमळा चाकण येथे परशुराम विठोबा बिरदवडे यांच्या राहत्या घरी गॅस सिलिंडरच्या टाकीचा स्फोट झाला. यामध्ये शेजारच्या घरावर भिंत पडून चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय.७५वर्षे ) यांचा मृत्यू झाला. यासह भाऊ यांच्या पत्नी लक्ष्मीबाई बिरदवडे (वय.७८वर्षे ) यांच्या डोक्याला मार लागला. त्यांचा मुलगा तुकाराम परशुराम बिरदवडे हा किरकोळ जखमी झाला. सून संगीता सुरेश बिरदवडे (वय.४० वर्षे ) यांच्या पायास मार लागला असून, नातू अक्षय सुरेश बिरदवडे (वय.१८ वर्षे ) हा गंभीररीत्या भाजलेला आहे, तसेच नात वैष्णवी सुरेश बिरदवडे (वय.२० वर्षे ) ही किरकोळ जखमी झाली.
यांच्यासह तीन अनोळखी भाडेकरू ज्यामध्ये २ महिला व १ पुरुष जखमी झाले. हा स्फोट खूप मोठ्या स्वरूपाचा होता. यामध्ये घराची पडझड झालेली असून, घराच्या भिंती तुटून शेजारील अंजाबाई प्रभाकर केळकर (वय.७५ वर्षे ) यांच्या घरावर पडल्याने त्या जखमी झाल्या. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी मदतकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.