पुणे : लॉक डाऊनच्या काळात गॅस सिलेंडरचा बेकायदा साठा करुन त्याची जादा दराने विक्री करणार्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर पोलिसांनी अमित सुगंधचंद गोयल (वय ३०, रा. कोडियाड सोसायटी, चंदननगर) याच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गोयल यांच्या ताब्यातून विविध गॅस कंपन्यांचे १६ भरलेले सिलेंडर, ४८ ग्राहकांचे उपभोक्ता कार्ड आणि रोकड असा ३३ हजार ७३३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी बोपोडीमध्येही काळाबाजार करणार्या गॅस वितरक मालक व चालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट चार चे उपनिरीक्षक विजय झंजाड हे आपल्या पथकासह गस्त घालत असताना कर्मचारी अब्दुल करीम सय्यद यांना माहिती मिळाली की, वडगाव शेरीतील सागर पार्क लेन नंबर २ येथे एक गॅस एजन्सीधारक हा ७९६ रुपयांचा गॅस सिलेंडर १ हजार रुपयांना विक्री करतो आहे. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून गॅस सिलेंडरची खरेदी करण्यासाठी सापळा लावला. त्यावेळी गोयल हा त्याच्याकडे सिलेंडर विक्री करण्यासाठी कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसताना गॅस सिलेंडरची जादा दराने विक्री करताना आढळून आला.ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय झंजाड, विवेक सिसाळ, कर्मचारी सुरेंद्र साबळे,संदीप मुंढे, दीपक चव्हाण, मोहन वाळके, आबा गावडे अन्न पुरवाठा व वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केली.
गॅस सिलेंडरची साठेबाजी करुन जादा दराने विक्री : चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 9:22 AM
कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसताना गॅस सिलेंडरची जादा दराने विक्री
ठळक मुद्दे१६ भरलेले सिलेंडर, ४८ ग्राहकांचे उपभोक्ता कार्ड आणि रोकड असा ३३ हजार ७३३ रुपयांचा माल जप्त