पुणे - केरळहून मुंबईला जात असलेल्या गॅस कंटेनरला अपघात झाल्याने त्यातून नवले पुलाजवळ गॅस गळती झाली. यामुळे सातऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. हा अपघात शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजता नवले पुलाजवळ घडला.अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नाची शर्थ करुन ही गळती काही प्रमाणात बंद करण्यात यश मिळविले आहे.
बॉयलरसाठी वापरण्यात येणारा प्रॉपलीन गॅस घेऊन कंटेनर केरळहून मुंबईकडे जात होता. सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास शेजारुन जाणाऱ्या वाहन या कंटेनरच्या व्हॉलला घासून गेला. त्यामुळे या कंटेनरमधून गॅसची गळती सुरू झाली. प्रॉपलीन हा रंगहीन इंधन गॅस असून त्याला उग्र वास असतो. हे इंधन गॅस अत्यंत ज्वलनशील आणि गैर विषारी आहे. गॅसोलीनच्या शुद्धीकरणादरम्यान प्रॉपलीन हे इंधन मिळते. या गॅसची गळती झाल्याने परिसरात उग्र वास पसरला. त्यामुळे आजू बाजूचे लोक घाबरले.
अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांची गाडी घटनास्थळी पोहचली. या गाडीमध्ये टॉम्प कार्ड असते. त्याद्वारे मुंबईतील तज्ञांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सांगितलेल्या उपाय योजनेनुसार अग्निशामक दलाने गाडीतील लाकडाची पुट्टी या गळतीच्या जागी मारुन गळती रोखण्याचा प्रयत्न केला. ही गळती मोठ्या प्रमाणावर कमी झाली. आता जेथून गळती होत आहे. त्या ठिकाणी प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा लेप लावून ती गळती बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गळतीमुळे साताराहून मुंबईकडील वाहतूक बराच काळ वाहतूक ठप्प झाली आहे़ आता कंटेनर बाजूला घेतला असून तब्बल दोन तासानंतर साडेआठच्या सुमारास वाहतूक सुरू करण्यात आली आहे.