पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरूच आहे. अशातच आज सकाळी राजाराम पुलाजवळील जयदेवनगर येथे गॅस पाईप लाईन फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
त्या भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने ही माहिती दिली आहे. रस्त्यावर जोरजोरात पाईपलाईन फुटल्याचा आवाज येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या भागातील काही नागरिक रस्त्यावर कोणालाही थांबून देत नाहीयेत. सर्व वाहनेही वेगाने पुढे जात आहेत.
पुण्यात आगीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कात्रजमधील टेल्को कॉलनी येथे एमएनजीएलच्या पाईपलाईनला भीषण आग लागली होती. मात्र या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तत्परतेने घटनास्थळी दाखल झाल्या. व दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रसंगावधानतेमुळे पुढील धोका टळला होता. आताही राजाराम पूल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाईपलाईन फुटल्याने आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाईपलाईनमधून येणाऱ्या आवाजानेच नागरिक हैराण झाले आहेत.