रावेत : पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ मागील काही महिन्यांपासून स्थिर असली तरीसुद्धा पेट्रोल आणि डिझेल याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असताना आता घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १ मार्चपासून वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना ऐन उन्हाळ्यात उन्हासोबतच महागाईची झळ बसत आहे. दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत गॅस दरवाढीचा भडका उडत आहे. मागील चौदा महिन्यांतील गॅस दरवाढीवर नजर टाकली असता घरगुती वापराच्या गॅस दरात पाचवेळा वाढ करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर पुन्हा ५० रुपयांनी वाढले आहेत, तर व्यावसायिक सिलिंडर ३५० रुपयांनी वाढले आहेत.
घरगुती गॅस ५० रुपयांनी महागला
दोन ते तीन महिने घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर स्थिर राहिल्यानंतर तिसऱ्या वा चौथ्या महिन्यात सिलिंडरच्या दरवाढीचा चटका सर्वसामान्यांना बसतच आहे. मार्च २०२३ मध्ये सरकारने पुन्हा ग्राहकांना दरवाढीचा चटका दिला. जवळपास प्रतिसिलिंडर ५० रुपये वाढ केली जाते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी जे सिलिंडर १ हजार ७० रुपयांना मिळत होते त्यासाठी आता १ हजार १२० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्यावसायिक ३५० रुपयांनी महाग
केवळ घरगुती गॅस सिलिंडरचेच दर वाढत आहेत असे नाही. तर दरवाढीचे चटके व्यावसायिकांनाही बसत आहेत. २ फेब्रुवारी २०२३ अखेर व्यावसायिकांना एका सिलिंडरसाठी १८२९ रुपये मोजावे लागत होते. आता व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३५० रुपये इतकी भरघोस वाढ केल्याने सिलिंडरसाठी व्यावसायिकांना २ हजार १८० रुपये मोजावे लागत आहेत. मार्च उजाडताच तब्बल ३५० रुपयांची वाढ करून व्यावसायिकांना मोठा झटका दिला.