२०१४ ला गॅसचे भाव ४५० अन् आता हजारच्या पुढे; विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 05:02 PM2024-05-01T17:02:42+5:302024-05-01T17:02:54+5:30
देश पुढील पाच वर्षे कोणाच्या हातात राहणार हे ठरवणारी ही लोकसभेची निवडणूक, देश टिकला तर धर्म टिकतो
राजगुरूनगर : निवडणुका येतात-जातात, पदं येतात जातात, पण माणूस टिकला पाहिजे. त्यासाठी वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी आवश्यक असल्याचे सांगत, महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे खेड तालुक्यातील वाडा येथे प्रचार दौऱ्यावर होते. त्यावेळी गावातील हरिनाम सप्ताहाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अमोल पवार, अशोक खांडेभराड, बाबाजी काळे, आबा धनवटे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, नीलेश कड, मयूर दौंडकर, राजमाला बुट्टे पाटील, सोमनाथ मुंगसे, सुधीर भोमाळे, संजय घनवट आदी उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले की, वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्त्वाची आहे. निवडणुका येतात जातात, पदं येतात जातात, पण त्यातला माणूस टिकला पाहिजे. हीच भगवंतांची शिकवण आहे. संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिले. देश पुढची पाच वर्षे कोणाच्या हातात राहणार आहे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. २०१४ ला गॅस सिलिंडरची किंमत ४५० रुपये होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं गॅस सिलिंडरला पाया पडा आणि मग मतदानाला जा. आज गॅस सिलिंडरचे भाव हजाराच्या पुढे गेलेत. त्यामुळे तीनवेळा पाया पडा, मग विचार करून मतदान करा. जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो, आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो. त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करा, असे आवाहनही डॉ. कोल्हे यांनी केले.