- डॉ. मोहन आगाशे, पुणे पन्नास वर्षे मागे वळून पाहताना ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाने आम्हाला काय दिले. यापेक्षाही लोकांना आनंद देण्याची आम्हाला संधी मिळाली हे अधिक महत्त्वाचे आहे. या नाटकाने कुणी कलाकारांनी बंगले बांधले नाहीत. सर्व कलाकारांंनी तब्बल वीस वर्षे हे नाटक कोणतेही पैसे न घेता केले. हे विशेष!
’घाशीराम कोतवाल’मधील ‘नाना फडणवीस हा शक्तीशाली व्यक्तीचे तर ‘घाशीराम’ हा सामान्य व्यक्तींचे प्रतिनिधित्व करत होता. सत्ताधीश स्वत:च्या फायद्यासाठी व्यक्तींचा कसा वापर करून घेतात हे दाखविले आहे. एक प्रसंग आजही आठवतोय. मी ससूनमध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करीत होतो. नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाल्यानंतर चारच दिवसांत मेहुणे ससूनच्या माझ्या निवासस्थानी आले. माझ्या वडिलांना कोणीतरी फोन करून सांगितले होते की आगाशे यांना सरदार कर्तारसिंह थत्ते नावाचा गृहस्थ मारणार आहे. त्यामुळे वडिलांनी काळजीपोटी त्यांना पाठविले होते. तेवढयात सरदारसारखे गृहस्थ हातावर छडी मारत ‘आगाशे कोणं’ म्हणत आले. ‘नाना’ ची भूमिका तुम्ही करू नका, असे ते म्हणाले. मी तुमच्या मतांचा आदर करतो. हे नाटक आहे आणि कुणी स्वतंत्र विचार केला तर त्याला ते करू द्यावे. माझ्या काही वक्तव्याचा राग येऊन त्यांनी माझ्यावर काठी उगारली.
पोलिसांनी ती अडवली. त्याला उचलून व्हॅनमध्ये नेले. माझ्याबरोबरचे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ मध्ये पडले. त्यांनी कर्तारसिंह थत्ते यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला, अशी तक्रार दिली परत ते भेटले तेव्हा आता तुम्हाला मारणार नाही. मला निवडणुकीचा फॉर्म भरायचा आहे असे सांगून निघून गेले.
’घाशीराम कोतवाल’ हे नाटक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले. १६ डिसेंबर १९७२ रोजी विजय तेंडुलकरलिखित व जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला होता. या नाटकाला शु्क्रवारी (दि. १६) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मूळ नाटकात डॉ. मोहन आगाशे यांनी ‘नाना फडणवीस’ यांची अजरामर भूमिका साकारली होती.