नेहरूनगर : येथील पीएमपी डेपोजवळ महाराष्ट्र नॅचरल गॅसचे कर्मचारी बोअरवेलचे खोदकाम करीत असताना वाहिनी फुटल्यामुळे गॅसची गळती झाली. तातडीने सर्व उपाययोजना केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नॅचरल गॅसवाहिनी नेहरूनगर येथील बस डेपोजवळ आहे. या वाहिनीशेजारी विद्युत आर्थिंगसाठी बोअरवेल घेण्याचे काम सुरू होते. बोअरवेलच्या गाडीच्या साहाय्याने खड्डा खोदत असताना अचानक ३.३० च्या सुमारास गॅसची वाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती झाली. येथील कर्मचार्यांनी तातडीने महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या इमर्जन्सी व्हॅनला, अग्निशामक दलाच्या बंबाला कळविले. यानंतर नेहरूनगर हॉकी स्टेडिअमकडून बसडेपोकडे येणारी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली. घटनास्थळी गर्दी झाली होती. महाराष्ट्र नॅचरल गॅसचे सुरक्षा व्यवस्थापक सागर वर्मा व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापनप्रमुख ओमप्रकाश बहिवाल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे लीडिंग फायरमन तानाजी चिंचवडे, नामदेव वाघे, विलास पाटील, प्रतीक कांबळे, अनिल माने, पुंडलिक भुतापल्ले, शांताराम घोर आदी कर्मचार्यांनी गळती होत असलेल्या वाहिनीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाण्याचा मारा केला. दुरुस्तीनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. (वार्ताहर)
नेहरूनगरला गॅसगळती, नागरिकांची तारांबळ
By admin | Published: May 15, 2014 5:08 AM