पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र (डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज) विभागाला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून टी-५५ प्रकारचा रणगाडा भेट देणार आहे. हा रणगाडा बुधवारी पहाटेपर्यंत दाखल होणार असून, तो या विभागासमोरील आवारात ठेवणार आहे. त्याचे अनावरण दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हॅरिस यांच्या हस्ते बुधवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता केले जाणार आहे.संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे भारतीय लष्कराशी दीर्घ काळापासून संबंध आहेत. परस्परांमध्ये काही करार झाले आहेत व अभ्यासाची देवाण-घेवाण होते. त्यामुळेच लष्कराने ही भेट दिली आहे, अशी माहिती या विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम उपस्थित राहणार आहेत.लष्कराने या विभागाशी केलेल्या करारात ‘छत्रपती शिवाजी पॉलिसी चेअर’ स्थापन केली आहे. त्याअंतर्गत लष्करातील ब्रिगेडियर, त्यापुढच्या पदावरील व्यक्तीची संशोधन व अध्यापनासाठी दोन वर्षांसाठी निवड केली जाते. आतापर्यंत लेफ्नंट जनरल अशोक जोशी, लेफ्टनंट जनरल एच. एम. खन्ना, लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, मेजर जनरल राव, मेजर जनरल संजय भिडे हे या अध्यासनावर होते. सध्या लेफ्टनंट जनरल ए. एल. चव्हाण त्यावर कार्यरत आहेत. याशिवाय भारतीय लष्कर व विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाकडून दर वर्षी ‘जनरल बी. सी. जोशी व्याख्यान’ आयोजित केले जाते. त्यासाठी पायदळ, नौदल व वायूदलाचे प्रमुख आळीपाळीने येतात.युद्धात झाला होता रणगाड्याचा वापरदक्षिण मुख्यालयाकडून विद्यापीठाला भेट मिळालेला रणगाडा रशियन बनावटीचा आहे. त्याद्वारे मध्यम पल्ल्यापर्यंत मारा करता येतो. तो सुमारे पाच फूट खोलीच्या पाण्याचा अडथळा सहज पार करू शकतो. त्याचे वजन ३६ टन इतके आहे. त्याचा वापर पाकिस्तानविरुद्ध १९६५ आणि १९७१ साली झालेल्या युद्धांमध्ये करण्यात आला आहे.
दक्षिण मुख्यालयाकडून विद्यापीठाला रणगाडा भेट, संरक्षणशास्त्र विभागाच्या आवारात आज अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:21 AM