भारतीय सैन्यदलात २१ अधिकारी, जवानांना परमवीर च्रक प्राप्त झाले आहे. ‘गाथा शाैर्यपदकांची परमवीर चक्र’ या पुस्तकात प्रवीण वाळिंबे यांनी परमवीर चक्र प्राप्त शूरांनी युद्धभूमीत गाजविलेल्या पराक्रमाचा सविस्तर वृत्तांत मांडला आहे. युद्धाची पार्श्वभूमी, तयारी, प्रत्यक्ष युद्धात रणनीती आखत शत्रूंचा केलेला पाडाव वाळिंबे यांनी योग्यरीत्या शब्दबद्ध केला आहे. हे पुस्तक वाचताना वाचकांच्या डोळ्यासमोर थेट रणांगणाचे चित्र उभे राहते. बिकट परिस्थितीत भारत मातेचे रक्षण करण्यासाठी जवानांनी दिलेला लढा अंगावर शहारे आणतो. तनया-ईशा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाची बांधणी चांगली आहे. युद्धाचे वर्णन करताना प्रत्यक्ष युद्ध प्रसंगांतील छायाचित्रेही पुस्तकात दिली आहेत. यामुळे त्या वेळेची प्रचिती वाचकांना येते.
वाळिंबे यांनी या पुस्तकात भारतीत सशस्त्र दलांचीही माहिती दिली आहे. यामुळे सर्वसामान्यांना लष्कराची ओळख पटते. भारतीय लष्कर, नाैदल आणि हवाई दलात असलेली पदे आणि त्यांना मिळणारा मान याचीही माहिती साध्या सोप्या शब्दांत सर्वसामान्य वाचक डोळ्यासमोर ठेवून वाळिंबे यांनी दिली आहे. एवढेच नाही, तर तिन्ही दलांचे आतापर्यंत झालेल्या प्रमुखांची माहितीही या पुस्तकात वाचकांना मिळणार आहे. विषेश म्हणजे गेल्या वर्षी लडाख येथे गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षाची माहितीही वाळिंबे यांनी पुस्तकात दिली आहे. भारतीय लष्कराची माहिती देणारे तसेच अनेक युद्धांचे वर्णन करणारी अनेक पुस्तके बाजारात आहेत. मात्र, ‘गाथा शाैर्यपदकांची परमवीर चक्र’ हे पुस्तक वाचकांना वैविध्यपूर्ण माहिती देणार आहे.