- अभिजित कोळपेपुणे : प्रतिदिन जवळपास ७५० दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रक्रिया केंद्रांची क्षमताच कमी आहे. शिवाय अनेक ठिकाणी प्रक्रिया होण्यापूर्वीच हे पाणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पुण्यातील ‘मुळा आणि मुठा’ गटारगंगा बनल्या आहेत. त्याचा परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत आहे.
पुण्याची लोकसंख्या ५२ लाखांच्याही पुढे गेली आहे. पुण्यात प्रतिदिन ७५० दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. या पाण्यावर शहरातील वेगवेगळ्या भागांत ९ ठिकाणी प्रक्रिया केली जाते. मात्र, या केंद्रांची क्षमताच कमी असल्याने बाहेर येणारे पाणी गटारासारखेच असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे पाणी खडकवासला धरणापासून खाली मुठा नदीपात्रात सोडले जाते. औंधकडून पुण्यात येणाऱ्या मुळा नदीतही असेच घाण पाणी सोडले जाते. शिवाय या दोन्ही नद्यांमध्ये अनेक कारखान्यांकडून रसायनयुक्त दूषित पाणीही मोठ्या प्रमाणात सोडले जाते. संगमवाडी येथे या नद्यांचा संगम होतो. तेथे नदीतील पाणी गटाराप्रमाणेच झाले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सांडपाणी मिसळले जाते त्या मुठा नदीतील पाण्याचा उपयोग हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यांतील १०० पेक्षा अधिक गावांतील शेतकरी आपल्या ७६ हजार ९८१ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी करतात. पुढे हे पाणी उजनी धरणात जाते. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी, तसेच शेती व औद्योगिक कारखान्यांच्या वापरासाठी हे पाणी वापरले जाते. शिवाय मुळा-मुठा नदीकाठच्या अनेक गावांतील नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरतात. या गावांत गॅस्ट्रो, विषमज्वर, कॉलरा व पोटाच्या विकारांची समस्या उद्भवत असल्याचे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पुण्यातून दररोज वेगवेगळ्या भागांतून निघणाºया सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ९ ठिकाणी प्रक्रिया केंद्रे असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण केंद्राचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांनी दिली. मैलापाणी एकत्रित करून आणण्याचे काम महापालिका करीत आहे़ मात्र, ही वाहिनी ब्लॉक झाल्यावर चेम्बर फोडण्याचे प्रकार सातत्याने होत असतात़ त्यामुळे हे मैलापाणी थेट नदीत जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रदूषणामुळे मुळा-मुठा नदीत जिवंतपणाच राहिला नाही़ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कार्यक्षमता केवळ ४० टक्क्यांपर्यंतच आहे.अनेक ठिकाणी हे मैलापाणी तसेच नदीत सोडले जाते. हेच पाणी पुढे उजनी धरणात जाते. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या पुणे, सोलापूर जिल्ह्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्याविरोधात आम्ही पुणे महापालिकेशी लढा देत असल्याचे नदी प्रदूषणावर काम करणारे कल्पेश यादव यांनी सांगतले.
प्रक्रिया केंद्रे नावालाच
पालिकेने नदीमध्ये मैलापाणी जाऊ नये म्हणून हजारो कोटी खर्चून ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत़ पालिकेला यातून कुठलेही उत्पन्न मिळत नाही. या केंद्रांतील सांडपाणी पुन्हा नदीत येते. त्यामुळे ही केंद्रे केवळ नावालाच चालू आहेत.-प्रमोद देवकर पाटील,अध्यक्ष, कर्तव्य जनमंच