पुणे - शहरातील कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत गवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले आहे. अत्यंत दाट लोकवस्तीत रानटी प्राणी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गवा सदृश्य रानटी प्राणी सोसायटीत आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष महेश गोळे यांनी सांगितले. पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना हे दृश्य दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले.
गवा चुकल्यामुळे बिथरला आहे. तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा अंदाज आहे. पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल छाले असून मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे.
. मात्र गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत आहे. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम होऊन रक्त येत आहे.
रानगवा बिथरला असल्याने प्रथम त्याला शांत करण्यासाठी उपाययोजना करीत आहोत. तो बहूदा डूक्कर खिंडीतून रात्री आला असावा, मात्र नागरिकांनी म्हैस महणून दुर्लक्ष केले असावे, अशी माहिती वन विभागाचे अधिकारी दीपक पवार यांनी ʻलोकमतʼ ला दिली.
बिथरलेल्या रानगव्याला बेशुध्द करण्यासाठी वनविभागाकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणात डोस उपलब्ध नसल्याने मदत कार्य रेंगाळले आहे. ज्यादा डोसची तजवीज करण्यात येत आहे. या परिसरात आता बघ्यांची गर्दी झाली आहे.दरम्यान, जंगलातून चुकल्यामुळे भिंतींना धडका देणारा रानगवा आता काहीसा शांत झाला असून एके ठिकाणी शांत उभा आहे.दरम्यान भूलीच्या डोसची तजवीज करण्यात येत आहे.
रानगव्याला बेशुध्द करण्यासाठी आवश्यक तेवढ्या आषधाचाडोस वनविभागाला मिळाला असून आता थोड्याच मिनिटात तो डोस देण्यात येईल अशी वनविभागाने माहिती दिली आहे.
अयो ! गवा पळाला...
एका झाडाखाली शांत उभा असलेला गवा आता तेथून बाहेर पडून नागरी वस्तीकडे पळाला आहे. महात्मा सोसायटीच्या गेटवरून नागरी वस्तीकडे पळण्यात यशस्वी झालेला रानगवा भुसारी कॉलनी, गादिया इस्टेट, भारतीनगरमार्गे मुख्य पौडरसत्यावर आला आणि तेथून जूना कचराडेपोजवळील जंगलाकडे पळाला. त्याच्यामागे रेस्क्यू टीमबरोबरच अतिउत्साही नागरिक आरडा ओरड करीत पळत असल्याने गवा आणखीनच बिथरला आहे. आत्ता तो दिसेनासा झाला असून राहूल टॉवर्स परिसरात शोध घेतला जात आहे.
नागरिकांच्या प्रचंड गोंधळातच वन कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत तीनवेळा डार्ट (भूलदेण्यासाठी फेकून मारायचे इंजेक्शन) मारलेआहेत. त्यापैकी एक प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.दरम्यान नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होत आहे. नागरिकांमुळे गवा बिथरल्याने पोलिस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र नागरिक ऐकत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. सुदैवाने ६-७ किलोमीटर पळूनही गव्याने कोणालाही जखमी केलेले नाहीगवा आत्ता परत भारतीनगर सोसायटी परिसरात एका बंगल्यात बसला आहे.
तब्बल 3 तासांअखेर रानगवा जाळ्यात
तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर रानगवा कोथरूडमधील पौड रस्त्यावरील भारतीनगर सोसायटी ऋतुगंध बंगला परिसरात जाळ्यात अडकला आणि भुलीच्या इंजेक्शनमुळे बेशुध्द पडला. आता वन विभाग त्यास गाडीतून घेऊन जात आहे