लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्रतिष्ठापणा केली जाते. गणराय आल्यानंतर गौराईचेही आगमन होते. रविवारी गौरी घरोघरी विराजमान होणार आहेत. त्याच्या सजावटीसाठी घराघरात लगबग सुरू आहे. त्यासाठी बाजारपेठही सजली आहे.
गणराय आल्यानंतर गौरी येतात. त्या तीन दिवस राहतात आणि मग भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरींचे विसर्जन करण्यात येते. तीन दिवस आनंदाचे, उत्सवाचे वातावरण निर्माण होते. गणेशोत्सव आणि गौराई म्हटले की, विविध प्रकारच्या फुलांची सजावट आलीच. त्यात गणरायपाठोपाठ रविवार (दि. १२) रोजी गौरी आगमन होत असल्याने महिलावर्गाकडून गौरी स्वागत आणि सजावटीसाठी फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत फुलांची आवक होत आहे. त्यामुळे दर टिकून आहेत.
पुढील दोन दिवस फुलांच्या दरात दहा टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. असा अंदाज व्यापारी सागर भोसले यांनी व्यक्त केला.
मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे फुले भिजली आहेत. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या फुलांत भिजलेल्या फुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे झेंडूच्या भिजलेल्या फुलांना 10 ते 25 रुपये दर मिळत आहे. तर सुकलेल्या मध्यम दर्जाच्या फुलांना 30 ते 60 रुपये, तर अतिचांगल्या प्रतीच्या फुलांना 80 ते 100 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. मात्र अति चांगल्या प्रतीच्या फुलांचे प्रमाण कमी आहे. मागणी असल्याने चांगल्या प्रतीच्या सर्व फुलांची विक्री होत
असल्याचे भोसले यांनी नमूद केले.
-----
लागवड क्षेत्र वाढल्याने दरात घट
मागील वर्षी लॉकडाऊन होते. त्यामुळे अनेक मर्यादा होत्या. बाजार सुरू राहतील की बंद? याबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता. त्यामुळे लागवड क्षेत्रात मोठी घट झाली होती. परिणामी, बाजारात फुलांची आवक घटली होती.
------
जुई, चमेली आठशे रुपये किलो
गणेशोत्सव आणि गौरी आगमनानिमित्त दर वर्षी सजावट आणि सुंगधी फुलांना विक्रेते आणि ग्राहकांकडून मागणी वाढत असते. यंदाही या फुलांना वाढली आहे. त्यामुळे जुई आणि चमेली या फुलांना घाऊक बाजारात प्रतिकिलोला 800 रुपये दर मिळाला. मागणीच्या तुलनेत या फुलांची आवक खूपच कमी होत आहे.
- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फूलबाजार आडते
असोसिएशन