पुणे : ‘लक्ष्मी आली लक्ष्मी सोनपावलांनी’ असे म्हणत गौैराईंचे स्वागत केल्यावर दुसऱ्या दिवशी घरोघरी गौरीपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी घरोघरी गौरी भोजन आणि हळदी- कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. पारंपरिक आणि आधुनिकतेच्या साजात नटलेल्या गौराईंना सोळा प्रकारच्या भाज्या आणि गोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला. फराळाचे पदार्थ, फळे, मिठाई आदी पदार्थांची आरास गौराईंसमोर आकर्षक पध्दतीने मांडण्यात आली होती. संध्याकाळी घरोघरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
गणेश चतुर्थीनंतर तीन दिवसांनी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन करण्यात आले. कुटुंबातील आबालवृध्द या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते. गौैराईंची सजावट लक्ष वेधून घेत होती. प्रसन्न वातावरणात गौैराईंची आरती, पूजा आणि भोजनाचा कार्यक्रम पार पडला. लाडू, करंजी, चकली, शेव, चिवडा असे फराळाचे पदार्थ, विविध प्रकारची फळे, मिठाई यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. आरतीच्या वेळी प्रसादात पुरणपोळी, ज्वारीच्या पीठाची अंबिल, भाजी, सोळा भाज्या इत्यादींचा समावेश असतो. काही ठिकाणी गौरी भोजनाच्या दिवशी गौैराईंना ‘गोविंद विड्या’चा नैैवेद्य दाखवला जातो. यामध्ये सोळा पानांचा समावेश असतो.
तिसऱ्या दिवशी होणार विसर्जन
गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा, वस्त्र यांनी गौरींची पूजा करण्यात आली. या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती केली जाते. पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी मुख्यत: पुरणपोळीचा नैैवेद्य दाखवला जातो. पहिल्या दिवशी गौैराई कोवळ्या वयातील मुलींप्रमाणे, दुसऱ्या दिवशी नवविवाहितेप्रमाणे तर तिसऱ्या दिवशी समंजस गृहिणीप्रमाणे दिसतात, अशी श्रध्दा महिलांमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या दिवशी गौैराईंचे विसर्जन होणार आहे.