प्रज्ञा केळकर-सिंग।पुणे : ‘सात नसेल, पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी न?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरूपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करून संतापाला वाट करून दिली आहे. गौरी लंकेश यांची हत्या ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना असून, समाज कोणत्या दिशेने चालला आहे, याबाबत कलाकारांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका गौरी लंकेश यांची मंगळवारी राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी सात गोळ्या झाडून हत्या केली. पुरोगामी विचारांच्या पुरस्कर्त्या म्हणून गौरी लंकेश यांची ओळख आहे. प्रस्थापितांना लेखणीतून झोडपण्याचा त्यांचा आवाज यानिमित्ताने दाबण्यात आला आणि सोशल मीडियावर निषेधाची लाट उसळली.डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यानंतर लंकेश यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्र्रिया उमटत आहेत. कलाकारांनीही याविरोधात बंड पुकारले असून सोशल मीडियावरून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.विवेकाला विवेकाने उत्तर न देता बंदुकीचा वापर करणाºयांचा निषेध नोंदवला जात असून, त्यांचे लेखन थांबले तरी त्यांचे विचार थांबणार नाहीत. हे सत्र आपण किती दिवस सहन करणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी ‘तुम्ही माझ्या पोस्ट, लेख वाचता. सात नसेल, पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी न? मला वाटतं हो, ठेवायला हवी. बºयाच जणांनी तशी तयारी ठेवायला हवी असं दिसतंय...’ अशा शब्दांत लंकेश यांच्या हत्येबाबत फेसबुक अकाउंटवर मराठी आणि इंग्रजीत तीव्र आक्षेप नोंदवला आहे.स्वत:चे विचार परखडपणे मांडणाºयांचा जीव आता सुरक्षित नाही, त्यांची जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तरी आपण बोलत राहायला हवे या विचारांना अनेकांनी पाठिंबा दर्शवलाआहे.शेकडो जणांनी ही पोस्ट शेअर केली असून, ८००-९०० जणांनी त्याबाबत निर्भीडपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
गौरी लंकेश हत्या: आता बोलायलाच हवे... कलाकार होऊ लागले व्यक्त : सात नसेल, पण एका गोळीची तयारी मी ठेवायला हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:34 AM