पुणे : येत्या पाच दिवसात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. शहरात घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झालीये. त्यानिमित्ताने पुणे शहरातल्या रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, मंडई परिसर अशा मध्यवर्ती भागात गौरी - गणपतीच्या साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. आज रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागात खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. नागरिक पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार असल्याचे चित्रही सध्यस्थितीत दिसू लागले आहे.
कोरोनामुळे सर्व सणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याप्रमाणेच गणेशोत्सवही नियमात राहूनच साजरा करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मंडळांना मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसून आरोग्य शिबिरं भरवावी असंही सांगण्यात आलंय. पण घरोघरी उत्साहात गणरायाचे आगमन होणार आहे. नागरिक उत्साहाच्या वातावरणात कोरोना विसरल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाने गर्दी ना होण्याच्या दृष्टीने सणांवर निर्बंध घातले आहेत. पण नागरिक अशा सुट्टीच्या दिवशी अचानक बाहेर पडून गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाला आमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मागच्या वर्षीही गणेशोत्सवानंतर वाढले रुग्ण
मागील वर्षी महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनही जाहीर केले. पण सणासुदीच्या महिन्यात निर्बंधात शिथिलता आणण्यात आली. लोकांच्या श्रद्धेचा विचार करत घरोघरी सण साजरे होण्यासाठी थोड्या प्रमाणात सूट देण्यात आली होती. पण नागरिकांनी त्यावेळीही नियमांचे पालन केले नाही. आणि गणेशोत्सवानंतर पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. यंदाही तीच परिस्थिती दिसू लागली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोना नियमांना पायदळी तुडवण्याबरोबरच लोकांच्या मनातून भीती पूर्णपणे गेल्याचे चित्र दिसून येत आहे.