पुणे : पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर हे बुधवारी (दि. २१) सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर त्यांची सुसाईड नोट सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. आता त्यांच्या बाबत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली. बेपत्ता होण्याआधी त्यांनी पुणे विद्यापीठ रस्त्यावरील एका एटीएम मधून ५ हजार काढले होते. तसेच आपल्या फोनमधील सर्व डेटा डिलीट केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गौतम पाषाणकर हे बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता आहेत. याबाबत त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला होता. हा तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट हाती लागली. त्यात व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचे पाषणकर यांनी लिहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम यांनी बुधवारी दुपारी लोणी काळभोर येथे भेट दिली होती. त्यानंतर ते दुपारी ४ वाजताच्या सुमारास जंगली महाराज रोडवरील कार्यालयात गेले होते. त्यांच्या ड्रायव्हरने अनेकदा कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. यानंतर ड्राइव्हरने गौतम यांचा मुलगा कपिल याच्याशी संपर्क साधला, अशी माहिती पोलिसांनी पुढे दिली. कुटुंबीय शोध घेण्यात अपयशी ठरल्यानंतर कपिलने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हरवलेला अहवाल नोंदविले आहे.
तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आले. मागील काही दिवसांपासून व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असून कोणालाही जबाबदार ठरवू नये असं त्यांनी त्यात लिहिलं आहे. यानंतर तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असताना त्यांनी एटीएम मधून पैसे काढल्याची व फोन मधील डेटा डिलीट केला असल्याची माहिती समोर येत आहे.