Gautami Patil on Marriage | बारामती: "माझ्या कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळतोय. जाईल तिथे लोक माझ्या कलेला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. माता-माऊलीचं प्रेम मिळत आहे. तरुण गर्दी करतायेत. अशात तर लग्नाचा विचार नाही. पण एखादा अनुरुप मुलगा मिळाला की मी लगेच लग्न करेन. जसा कार्यक्रमात राडा करता, तसा लग्नातही राडा करा," अशी मिश्कील टिपण्णी प्रसिध्द नृत्यांगना कलाकार गौतमी पाटील हिने केली. माळेगाव (ता.बारामती) येथील येळेढाळे वस्तीत श्री लक्ष्मीआई यात्रेच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा तिने हे उत्तर दिले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे यांनी केले. यात्रा कमिटीने केलेले चोख नियोजनासह पोलिस निरीक्षक किरण अवचर व सहकारी पोलिसांनी कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कोणताही राडा, गोंधळ न होता कार्यक्रम शांतपणे पार पडला. यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यामध्ये विशेषत: महिलांची संख्या अधिक होती.
लग्नाचा विषय अन् गौतमी...
लावण्यांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी तिला मागील एका मुलाखतीत आपण लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. आपण कधी लग्न करणार आहात? असा प्रश्न विचारला. त्यावर तिने पत्रकारांशी बोलताना हसतहसत हि मिश्कील टिपण्णी केली.
दरम्यान, यावेळी सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, पाव्हणं जेवला का, बाई मी ऐवज हवाली केला, पाटलांचा बैलगाडा या गाण्यांसह थेट महिला वर्गासमोर जाऊन गौतमी पाटील यांनी केलेल्या नृत्याला ‘वन्स मोअर’ने उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.