- दुर्गेश मोरे
पुणे : चैत्राला सुरुवात झाल्याने गावागावांमध्ये घुंगराचा छनछनाट ऐकायला मिळत आहेत. नुकतीच तमाशा पंढरी नारायणगावात कोट्यवधींच्या सुपाऱ्या फुटल्या. पण याठिकाणी पुन्हा एकदा प्रश्न जुनाच पण नव्या पद्धतीने मांडण्यात आला. यंदा लोकनाट्यांना प्रतिसाद तसा कमीच मिळाला आहे. कारण यावेळी तरुणांना आठ-नऊ महिन्यांपासून उदयाला आलेल्या गौतमी पाटीलच्या मादक अदांचे नृत्य हवे आहे. केवळ गावागावातच नाही तर शहरातीलही तिचे शो फुल्ल झाले आहेत. घायाळ करणाऱ्या गौतमीच्या अदा पाहण्यासाठी शहरात तरुणांची तुफान गर्दी होते. मग, सर्वसामान्यांचे रंजन करणाऱ्या आमच्या तमाशाला थिएटर कधी मिळणार, असा प्रश्न तमासगीर उपस्थित करत आहेत.
तमाशा ही महाराष्ट्राची लोककला. ही कला जोपासण्याचे काम महार, मांग, कोल्हाटीसारख्या १८ पगड जातींनी केली. या कलेला सर्वांनीच उचलून धरले. दिवसा उदरनिर्वाहाच्या विवंचनेत असलेला कलाकार रात्री मात्र पैशाच्या पावसात चिंब भिजून निघत असतो. शाहीर पठ्ठे बापूराव, पवळा, विठाबाई, मंगला बनसोडेंपासून ते अगदी अलीकडे सुरेखा पुणेकरांपर्यंत अनेकांनी आपल्या कलेने रसिकांची मने जिंकली. विठाबाईंच्या ठसकेबाज लावणीमुळे तर त्यांना ‘तमाशासम्राज्ञी’ पदवी मिळाली. तमाशा गावगाड्यात राहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले तरी तमाशा माहीत नसणारा माणूस सापडणार नाही. आज जितकी ही कला लोकप्रिय आहे, तितकीच शहरी भागात ती अडगळीत पडल्याचे वास्तव आहे.
आठ-नऊ महिन्यांपूर्वी २८ वर्षीय गौतमी पाटीलचा लोणीकाळभोरला कार्यक्रम झाला होता. ‘राती... अर्ध्या राती... असं सोडून जायाचं न्हाय न्हाय...’ या गाण्यावर थिरकल्याचा तिचा व्हिडीओ समाजामाध्यमांवर इतका झळकला की, तिच्या या मादक अदाकारीने तरुणांच्या काळजावरच थेट घाव केला. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की तुफान गर्दी होते. गडबड गोंधळ, चेंगराचेंगरीच्याही घटना घडतात. काहीवेळा आयोजकांना डीजे बंदही करावा लागतो. मांडीवर शड्डू ठोकत मादक नजर-अदांनी समोरच्याला घायाळ करत ती तरुणाईला झिंगायला लावते. कोणा पुढाऱ्याचा वाढदिवस असो वा दुकानाचे उद्घाटन असो की अन्य काही तिचा सहभाग ठरलेलाच. हे सर्व जर शहरात चालत असले तर सामाजिक प्रबोधन करणारे वगनाट्य, गण, गौळण, विनोद, रंगाबाजी असणारा तमाशा का चालत नाही. पैसे देऊन कार्यक्रम करणे तर बंदच झाले आहे. महागाई वाढत चालली आहे. अजून किती दिवस असेच भटकायचे. आम्हालाही संसार आहे. तो सावरण्यासाठी एकदा तरी शहरातील रंगमंच खुला करा, अशी साद तमाशा कलावंत घालत आहेत.
तमाशापुढे आज विविध आव्हाने उभी आहेत. पैसे देऊन तमाशा पाहण्याची पद्धत जवळजवळ संपली आहे. त्यामुळे यात्रेच्या वेळी जी काही संपूर्ण गावची एकहाती सुपारी मिळते त्यातच सर्व काही भागवावे लागते. शिवाय प्रत्येक तमाशामध्ये साधारण १५ ते २० महिला कलाकार, त्यानंतर बिगारी, चालक यांच्यासह अन्य असे मिळून साधारण १०० जण तरी असतात. या मिळालेल्या पैशातून त्यांचा पगार आणि इतर खर्च भागविताना होणारी कसरत न पहावणारी आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीचा फटका हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेक तमाशे बंद झाले अन् कलावंतांची वाताहतही झाल्याचे पाहायला मिळते.