पौड : मुळशी तालुक्यात चार ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाची मतमोजणी पौड येथे पार पडली. त्यात माळेगावमध्ये काळभैरवनाथ विकास पॅनलने सरपंचासह सर्व जागांवर विजय मिळविला, तर आडमाळमध्येही जगदंबा पॅनलने एकहाती सत्ता राखली आहे. भोडे-वेडे ग्रामपंचायतीत वाघजाई समता पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.माळेगाव ग्रामपंचायतीत काळभैरवनाथ पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार केरभाऊ भिकोबा चौधरी यांनी नामदेव रामभाऊ चौधरी यांचा पराभव केला. केरभाऊंना २२७ तर नामदेव यांना २२६ मते मिळाली. याच ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक १ मध्ये दोन जागांसाठी निवडणूक झाली. त्यात धनंजय संपतराव मारणे (२२०) आणि मल्हार विठ्ठल डाळ (२०१) मते मिळवून विजयी झाले. श्रीहरी रामभाऊ मारणे (१४९) यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभाग एकमधून अंजना दत्तू मरगळे, प्रभाग ३ मधून अनिता महादेव शेडगे आणि रामभाऊ कोंडीबा मरगळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक २ मधील दोन्ही जागा रिक्त राहिल्या आहेत.आडमाळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जगदंबा पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. सरपंचपदाच्या निवडणुकीत हेमंत सोपान पासलकर यांनी अर्जुन विठ्ठल पासलकर यांचा ७६ मतांनी पराभव केला. हेमंत यांना ११० तर अर्जुन यांना ३४ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १ मध्ये संदीप गेनभाऊ पासलकर (३२) यांनी सागर बबन पासलकर (२४) यांचा ८ मतांनी पराभव केला. या ग्रामपंचायतीत अर्चना संतोष सणस, राणी सुरेश नाकती, सुरेखा लहू वाघमारे, सोनाली नरेंद्र पासलकर, मारुती गंगाराम मरगळे, लिलाबाई चंद्रकांत पासलकर हे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.आसदे ग्रामपंचायतीत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती झाली. सरपंचपद निवडणुकीत नरेश रामचंद्र भरम (१७६) यांनी श्री भैरवनाथ बापूजीबुवा विकास पॅनलचे विशाल ज्ञानेश्वर जोरी (१६३) यांचा १३ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ३ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रवीण सुरेश भरम यांनी रामदास शंकर भरम यांचा ८ मतांनी पराभव केला.प्रवीण यांना ६१ तर रामदास यांनी ५३ मते मिळाली. प्रभाग क्रमांक एकमधून संजय नथू जोरी, रंजना पांडूरंग शिंदे आणि प्रभाग ३ मधून सारिका अशोक निकाळजे हे बिनविरोध निवडून आले. तथापि या ग्रामपंचायतीत प्रभाग २ मधील दोन्ही जागा रिक्त राहिल्या असून प्रभाग एकमधील एक जागा रिक्त राहिली आहे.वाघजाई पॅनेलचे बहुमत, संगीता मारणे सरपंचभोडे-वेडे ग्रामपंचायतीतही वाघजाई समता पॅनलने बहुमत मिळविले आहे. येथे प्रभाग क्रमांक दोनमधील अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री या दोन्ही जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रभाग क्रमांकमधून अलका हिरामण कांबळे, साहेबराव नथू मरगळे, प्रभाग ३ मधून अंजना नथू मारणे बिनविरोध निवडून आल्या आहेत.सरपंचपदाच्या निवडणुकीत संगीता धनंजय मारणे (२८५) यांनी सुनंदा पुंडलिक शेडगे (१५४) आणि उषाराणी भिकासाहेब मारणे (२४) यांचा पराभव केला. प्रभाग प्रभाग १ मध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत उज्ज्वला मारुती मारणे (१३१) यांनी सारिका आप्पा शेडगे (६७) आणि उषाराणी भिकासाहेब मारणे (३१) यांचा पराभव केला. प्रभाग ३ मध्येही विशाल दत्तात्रेयहळंदे (३९) यांनी राजेंद्र रामभाऊ मारणे (२२), भिकासाहेब रामचंद्र मारणे (९) या दोघांचा पराभव केला.पौडच्या पंचायत समिती सभागृहात मतमोजणी झाली. तहसीलदार सचिन डोंगरे, निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण मोरे आणि अनिरूद्ध गिजे यांच्या नियंत्रणाखाली मतमोजणी शांततेत पार पडली. अवघ्या १५ मिनिटांत चारही ग्रामपंचायतीच्या मतमोजणीचे काम संपले.निकाल ऐकण्यासाठी माळेगाव, आडमाळ, आसदे, भोडे-वेडे गावच्या ग्रामस्थांनी पंचायत समितीबाहेर गर्दी केली होती. चारही ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आणि घोषणाबाजी करीत जल्लोष साजरा केला.मुळशी हे कार्यकर्त्यांचे मोहोळ मानले जाते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मोठे औत्सुक्य ग्रामस्थांना असते.माळेगाव ग्रामपंचायतीत काळभैरवनाथ पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार केरभाऊ भिकोबा चौधरी यांनी नामदेव राम्ांभाऊ चौधरी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. केरभाऊंना २२७ तर नामदेव यांना २२६ मते मिळाली.
गावगाड्याला मिळाले नवे कारभारी, मुळशीतील चार ग्रामपंचायती माळेगाव, आडमाळ, भोरे-वेडे येथे जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 2:57 AM