लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकऱ्यांना दर्जेदार व जादा उत्पादन देणारे बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाकडून बीजोत्पादन मोहीम राबवण्यात येत आहे. यात मिळालेले बियाणे खाण्यासाठी नाही तर फक्त पेरण्यासाठी म्हणून वापरायचे असते.
राज्यात सर्वत्र सध्या गहू व हरभरा या बियाण्यांसाठी ही योजना राबवली जात आहे. यात कृषी विद्यापीठांनी प्रयोग करून सिद्ध केलेले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी प्रत्यक्ष किमतीच्या निम्मीच किंमत शेतकऱ्याला द्यावी लागते. प्रत्येकी २ हेक्टरसाठी म्हणूनच हे बियाणे मिळते. त्यातून झालेले उत्पादन शेतकऱ्याने बियाणे म्हणूनच साठवणे, ते स्वत: वापरणे व दुसऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली.
शेतीतून एकरी जास्त उत्पादन मिळावे यासाठी कृषी संशोधकांकडून वेगवेगळे वाण विकसित केले जातात. त्यावर सतत संशोधन सुरू असते. कृषी विद्यापीठे या संशोधित बियाण्यांचा लहान क्षेत्रावर प्रत्यक्ष वापर करतात. तिथे जास्त उत्पन्न मिळते अशी खात्री झालेली बियाणेच या मोहिमेत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. एकदा तयार झालेले वाण पुढची सलग ३ वर्षे त्याच दर्जाचे राहते असे बोटे यांनी सांगितले.
महाडीबीटी पोर्टलवर या बियाण्यांसाठी मागणी नोंदवण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. त्यासाठीच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची सोडत काढली जाईल व निवड झालेल्या शेतकऱ्यांना टोकन वितरित करून ते दाखवल्यानंतर महाबीज विक्रेत्यांकडून त्यांना बियाणे मिळेल. त्याची पेर करून त्यांनी बियाणे तयार करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.