पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील दोन रिक्त जागेवर भाजपचे राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांची शुक्रवारी (दि.२० एप्रिल) ला झालेल्या महासभेत वर्णी लावली आहे. महापौर नितीन काळजे यांनी दोघांची नावे जाहीर केले. महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी डावलेल्या नाराजीतून सदस्य राहुल जाधव व शीतल शिंदे यांनी राजीनामा दिले होते. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्या जागी गावडे व चिंचवडे या दोघांची निवड करण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे समर्थक जाधव हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांच्याबरोबरच निष्ठावंत गटाचे शिंदे आणि विलास मडिगेरी यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा होती. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी तेही इच्छूक होते. परंतु, ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव, शिंदे यांनी राजीनामे दिले.परंतु, ते मंजूर करण्यात आले नव्हते.स्थायी समिती सभापतीची निवडणूक पार पडल्यावर महिन्याभरानंतर जाधव यांचा राजीनामा महापौर काळजे यांनी मंजूर केला होता. तर शिंदे यांनी गेल्या आठवड्यात स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपमहापौर शैलजा मोरे यांनी शिंदे यांचा राजीनामा त्वरित मंजूर केला होता.
पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीवर गावडे आणि चिंचवडे यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 3:28 PM
ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव, शिंदे यांनी राजीनामे दिले.
ठळक मुद्दे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी डावलेल्या नाराजीतून राजीनामे