पुणे : स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणेतर्फे हौशी कलाकारांसाठी आयोजित केलेल्या ज्येष्ठ ऑर्गनवादक कै. चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे स्मृती ऑनलाईन नाट्यगीत गायन स्पर्धेत १८ ते ४० या वयोगटात सांगलीची गायत्री कुलकर्णी तर ४० वर्षांवरील खुल्या गटात पुण्याचे संजय धुपकर हे कै. हरिभाऊ नारायण देशपांडे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले.
ऑनलाईन नाट्यगीत गायन स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून १८ ते ४० या वयोगटात ३४ तर ४० वर्षांवरील खुल्या गटात २३ स्पर्धक सहभागी झाले होते. स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने २०१८ मध्ये प्रतिष्ठानची पुणे येथे स्थापना केली आहे. या उपक्रमातील पुढचे पाऊल म्हणून प्रतिष्ठानतर्फे हौशी कलाकारांसाठी या वर्षीपासून नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारूशीला केळकर यांनी दिली. दोन्ही गटातील प्रथम क्रमांकासाठी ३०००/-, द्वितीय क्रमांकासाठी २०००/-, तृतीय क्रमांकासाठी १०००/- रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५००/- रुपये तसेच प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असे प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सुचेता अवचट यांनी सांगितले. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय गोगटे आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते रवींद्र कुलकर्णी यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
वयोगट : १८ ते ४० : प्रथम : गायत्री कुलकर्णी (सांगली), द्वितीय : स्वानंद देशमुख (जळगाव), तृतीय : मिताली वाळिंबे (पुणे), उत्तेजनार्थ : अद्वैत मराठे (पुणे), निहाल खांबेटे (दापोली).
वयोगट ४० वर्षांवरील खुला : प्रथम : संजय धुपकर (पुणे), द्वितीय : रवींद्र मधुसूदन कुलकर्णी (पुणे), तृतीय : ज्योती फाटक (पुणे), उत्तेजनार्थ : डॉ. प्रीती गोखले (पुणे), मनोहर सोनावणे (पुणे).