लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : घरातील साडेआठ लाख रुपयांचे दागिने चोरून प्रियकराला ते देऊन पसार होण्यासाठी मदत करणाऱ्या व काश्मीर येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विवाहितेवर विमानतळ ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा नोंदविला.रूपाली जनार्दन निंबाळकर आणि भरत सरगर अशी आरोपींची नावे आहेत. सरगर पसार झाला आहे. लोहगाव येथील ४५ वर्षीय व्यक्तीने फिर्याद केली आहे. २४ मे रोजी रात्री ९च्या सुमारास हा प्रकार झाला.पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रूपाली घाईघाईने घरातून बॅग घेऊन जाताना दिसली. तिचा पती तिच्यामागोमाग गेला असता ती अंधारात लपून बसली. तिच्या पतीने तिला घरी नेऊन विश्वासात घेऊन या प्रकाराविषयी विचारले असता तिने आपल्या प्रेमसंबंधांची माहिती दिली. सरगर याच्या ताब्यात ३० तोळे सोने असलेली बॅग आपण दिली होती. आपण दोघे जम्मू-काश्मीर येथे पळून जाणार होतो, असे रूपालीने सांगितल्यावर तिच्या पतीने कपाटात तपासणी केली. महिनाभरापूर्वी केलेले साडेआठ लाख रुपयांचे दागिने लंपास असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दोघांबाबत फिर्याद दिली.
प्रियकराला चोरीमध्ये साथ देणारी गजाआड
By admin | Published: May 29, 2017 3:12 AM