बारामती : बारामतीमध्ये कोरोनाचा आलेख वाढू लागल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यायांवर करडी नजर ठेवण्याचत येत आहे. बारामती उपविभागामध्ये दिवसाला ३०० च्या वर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
मागील तीन दिवसांपासून बारामती शहर व तालुक्यातील करोना संक्रमित रुग्णांची दैनंदिन आकडेवारी ४० च्या घरात पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. एकीकडे कोरोना लसीकरण सुरू असताना संक्रमित रुग्णांची वाढणारी आकडेवारी चिंताजनक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.२०) बारामती येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ द्यायची नसेल तर प्रत्येकाने नियमावलीचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. यानंतरही बारामती शहर व तालुक्यात अजुनही नागरिक बेफिकीरपणे फिरत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवर होणा-या विनाकारण गर्दीला आळा घालणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडे याकडे म्हणावे तेवढे लक्ष नाही.
बाजारापेठेत होणारी गर्दी देखील चिंताजनक आहे. अनेक दुकानांमधून सॅनिटायझर गायब झाले आहे. तर प्रशासनाच्या आवाहनानंतर शहरातील प्रत्येक दुकानामध्ये ‘नो मास्क नो इंट्री’चे बोर्ड लागले आहेत. मात्र खुद्द दुकानदारच विनामास्क असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले. त्यामुळे भरारी पथकांच्या माध्यमातून अशा दुकानदारांवर व विनाकारण गर्दी करणा-यांवर कारवाई करण्याची गरज आहे. सोमवारी (दि.२२) सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय भवनमध्ये तोबा गर्दी झाली होती. विशेष म्हणजे दोन दिवस आधीच उपमुख्यमंत्री पवार यांनी गर्दी करू नका, अशी सूचना बारामतीकरांना केली होती. त्यानंतरही झालेल्या गर्दीमुळे कोरोनाबाबत नागरिक बेफिकीर झाले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासकीय कार्यालयामध्ये अनावश्यक गर्दी करणारावर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या नियम मोडणा-यांवर दिवसाला ३०० च्यावर केसेस दाखल होत आहेत. मंगल कार्यालये, हॉटेल व्यावसायिक यांनादेखील सूचना दिल्या आहेत. ५० व्यक्तींची ज्या ठिकाणी गर्दी दिसेल त्यांची पथकामार्फत तपासणी करून कारवाई करण्यात येईल. सोमेश्वर कारखाना निवडून अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय भवनमध्ये गर्दी करणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. माहिती पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- नारायण शिरगावकर
उपविभागीय पोलीस अधिकारी
बारामती उपविभाग
बारामती उपविभागामध्ये आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांवर झालेली कारवाई
तालुकेएकूण केसेसदंड
बारामती २८,८७६ ४९,९९,१००
इंदापूर २७,७३५ ४८,९८,३००
बारामती उपविभाग ५६,६११ ९८,९७,४००