GBS Pune Latest News: जीबीएस आजाराचा संसर्ग झालेल्या आणखी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील एका ३७ वर्षीय व्यक्तीचा कमला नेहरू रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यातील जीबीएस रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
राज्यात गुइलेन बॅर सिंड्रोम (GBS) आजाराच्या रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. राज्यातील रुग्णांची संख्या १९२ वर पोहोचली असून, १६७ रुग्णांना जीबीएसचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत राज्यात जीबीएसचा संसर्ग होऊन ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील बिबवेवाडीतील एका ३७ वर्षीय व्यक्तीला जीबीएसचा संसर्ग झाला होता. त्याच्यावर कमला नेहरू रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी रात्री या व्यक्तीचा मृत्यू झाला.
४८ आयसीयूमध्ये, तर २१ रुग्ण व्हेटिंलेटरवर
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जीबीएसचा संसर्ग झालेले ४८ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. तर २१ रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. सक्रीय रुग्णांपैकी पुणे महापालिका हद्दीत ३९ रुग्ण, पुण्यालगत असलेल्या गावात ९१ रुग्ण, पिंपरी चिंचवडमध्ये २९ रुग्ण, पुणे ग्रामीण भागात २५ रुग्ण, आणि राज्यातील इतर जिल्ह्यात ८ रुग्ण आहेत.
पश्चिम बंगालमध्येही तीन जणांचा जीबीएसमुळे मृत्यू
पश्चिम बंगालमध्येही आतापर्यंत जीबीएस या आजारामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर परगणा जिल्ह्यातील जगद्दल येथील देबकुमार साहू आणि अमडंगा येथील अरित्र मनाल या दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला तिसरा रुग्ण हुगळी जिल्ह्यातील आहे.