पुणे : शहरात गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)चे संशयित रुग्ण आढळलेल्या नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरीच्या काही भागाला पुणे महापालिका विनाप्रकिया केलेले पिण्याचे पाणी देत आहे. या पाण्यामध्ये महापालिका केवळ ब्लिचिंग पावडर टाकत आहे. महापालिका या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा पुरवठा कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे महापालिकेत गावे समाविष्ट झाली आहेत; पण या गावांना पूर्वी असलेल्या ग्रामपंचायतीच्या यंत्रणेमधूनच पाणीपुरवठा केला आता आहे. नांदेड गावात जुनी विहीर आहे. या विहिरीत पुणे महापालिकेने धरणातून पाइपलाइनद्वारे येणारे पाणी सोडले आहे. या विहिरीतून नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, धायरीच्या काही भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या सर्व भागांना पुणे महापालिकेतर्फे विनाप्रक्रिया पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यातच परिसरातील नागरिकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळली आहेत तेथील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून, त्याची तपासणी केली जात आहे. नांदेड गावातील विहिरीची आणि परिसराची पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. पाहणी करणार आहेत.
ड्रेनेज लाइनची केली जाते साफसफाई
नांदेड गावातील विहिरीच्या आजूबाजूला असणाऱ्या ड्रेनेजलाइनचे पाणीदेखील यात मिसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ड्रेनेजलाइनचीही साफसफाई केली जात आहे.
संशयित रुग्णांची संख्या दोनने वाढली
पुणे महापालिका हद्दीत मंगळवारी ‘जीबीएस’चे पाच रुग्ण होते. नव्याने दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील संशयित रुग्णसंख्या ७ झाली आहे.
‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’चा संसर्ग
गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) बाधित काही रुग्णांच्या तपासणीत कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जिवाणू संसर्ग समोर आला आहे. न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे या संस्थेने या संसर्गासाठी दूषित पाणी आणि अन्न कारणीभूत असल्याकडे बोट दाखविले आहे.
धरणातील पाण्यात सोडले जाते सांडपाणी
खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट, फार्म हाऊस, गृहप्रकल्प उभारले गेले आहेत. यामधील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट धरणाच्या पाण्यात सोडले जात आहे. त्यामुळे धरणाचे पाणी दूषित होत आहे. याबाबत सातत्याने आवाज उठवूनही पुणे जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, पीएमआरडीए आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या सर्व यंत्रणा एकप्रकारे लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.