पुणे : शहराच्या सिंहगड रस्ता परिसरात महिनाभर थैमान घालणाऱ्या गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)ची साथ ओसरली असे वाटत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नवीन समाविष्ट गावांमध्ये या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. धायरी आणि नर्हे परिसरात गेल्या आठवड्यात नवीन संशयित रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे या भागात तातडीने शुध्द पाण्य़ासाठी उपाययोजन कराव्यात तसेच या भागातील पाण्य़ाची तपासणी करावी, असे पत्र आरोग्य विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास दिले आहे. त्यामुळे या साथीने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे.
डेक्कन येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर एका सात वर्षीय मुलावर जीबीएसचे उपचार सुरू आहेत. हा रुग्ण मानाजीनगर, नवले ब्रिज परिसरातील रहिवासी असून, तो पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. तसेच, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातही धायरी गावातील एका रुग्णाला गंभीर स्थितीत दाखल केले आहे. काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल असलेल्या एका १० वर्षीय रुग्णाच्या पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांची तपासणी केली होती. तपासणीमध्ये मानाजी नगर येथील खासगी विहिरीचे पाणी आणि एका खासगी आरओ प्रकल्पाचे पाणी वापरत असल्याचे समोर आले आहे. तर, या पूर्वीच्या तपासणीत या आरओ प्रकल्पाचे पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागात पुन्हा या साथीचा प्रसार होण्याची भीती असल्याने तातडीने या तीनही ठिकाणांच्या पाण्याची तपासणी करून या भागात शुध्द पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागास करण्यात आल्या आहेत.