ठळक मुद्देगदिमांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होण्यापूर्वीच स्मारकाचे काम सुरू करू असे ठाम आश्वासन
पुणे : गेल्या दहा बारा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गदिमा स्मारकाच्या प्रश्नाबाबत माडगूळकर कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा आवाज उठविल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले आहे. पुढील दोन आठवड्यात महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या जागेचा आढावा घेऊन स्मारकासाठी नवीन जागा उपलब्ध करून देऊ, पुण्यात गदिमांचे यथायोग्य स्मारक नक्की होईल व जन्मशताब्दी वर्षातच होईल असे आश्वासन महापौरांकडून देण्यात आले आहे. दहा बारा वर्षांपासून गदिमांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. आजमितीला तब्बल दोन कोटी रूपये खर्च करून केवळ सीमाभिंतीच उभ्या राहिल्या आहेत. ही जमीन बांधकाम नियमावलीच्या विविध बेल्ट (नदीकाठी आहे) मध्ये येत असल्याने इथे बांधकाम करता येणे शक्यही नसल्याचे माहिती असूनही दुसरी जागा शोधता आली नाही. इतक्या वर्षात स्मारकाची एक वीटही उभारली जाऊ नये. गदिमांचे कार्यक्षेत्र असणा-या महानगरपालिकेला गदिमांच्या स्मारकाचे वावडे आहे का? यंदाच्या वर्षी गदिमांच्या जन्मशताब्दीवर्षाला प्रारंभ होत आहे. या जन्मशताब्दीवर्षात तरी स्मारकाच्या कामाला मुहूर्त लागत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार का? असा सवाल माडगूळकर कुटुंबियांकडून उपस्थित करण्यात आला होता. त्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाल्यानंतर 'गदिमा स्मारका' संदर्भात गदिमांचे नातू सुमित्र गाडगीळ, साहित्य संंमेलनाचे माजी अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, प्रशांत कुलकर्णी व शैलेश टिळक यांनी पुढाकार घेऊन महापौर मुक्ता टिळक यांची शुक्रवारी भेट घेतली. गदिमांचे स्मारक लवकरात लवकर व्हावे यासाठी तिघांनी संयुक्तपणे महापौरांना निवेदन दिले. त्यांना दहा-बारा वर्षे रखडलेल्या स्मारकाच्या स्थितीची कल्पना दिली व सध्या नदीकाठच्या उपलब्ध जमिनीत स्मारक होऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावर महापौरांनी आम्ही लवकरात लवकर म्हणजे १ आॅक्टोबर २०१८ या गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होण्यापूर्वीच स्मारकाचे काम सुरू करू असे ठाम आश्वासन दिले आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे ठरले असून राज्य सरकारकडून शक्य तितकी मदत करावी असे निवेदन आम्ही त्यांना असल्याचे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.