पुणे : पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा नेहमीच विविध कारणांनी गाजत असते. कधी चित्रविचित्र आंदोलने तर कधी एखाद्या सभासदाची लक्षवेधी वेशभूषा यामुळे महापालिकेच्या सभेत अनेकदा हशाही पिकतो. मात्र सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गेटनेते अरविंद शिंदे यांच्यात बाचाबाची बघायला मिळाली.
अतिक्रमण अधिकारी किशोर पाडळ यांना एक हॉटेलवर कारवाई केल्याच्या प्रकरणी महापालिकेत येवून मारहाण झाली होती. त्यावरून काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह काही सभासदांनी सवाल उपस्थित केला. अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे मतही काही सभासदांनी व्यक्त केले. ही चर्चा सुरु असताना भिमाले यांनी पडाळे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून त्या अधिकाऱ्याची बाजू शिंदे का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित करीत यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यास सुरुवात केली. काँग्रेस गटनेता अरविंद शिंदे हा एजंट आहे, हा गरिबांचे पैसे खातो, हा फ्रॉड माणूस आहेया अशा शब्दात भिमाले यांनी अरविंद शिंदे यांच्यावर आरोप केले. त्यावर अधिकाऱ्यांना केबिनमध्ये येऊन मारहाण करणे चुकीचे असून त्यांना संरक्षण मिळावे अशी भूमिका अरविंद शिंदे यांनी घेतली. यामुळे दोन्ही नेते भर सभागृहाताच एकमेकांच्या विरोधात भिडले.या प्रकारामुळे सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ माजला. त्यामुळे अधिकाऱ्यांना खुलासा करणे अवघड झाले. भरीसभर म्हणून भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवकही एकमेकांसमोर आल्यामुळे सभागृहात गोंधळ अधिक वाढला. अखेर महापौर आणि इतर गटनेत्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.