पुणे : जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू ही शोकाकुल घटना आहे. पण त्यांचा मृत्यू हा घात की अपघात, ही चर्चा चुकीची आहे. समाजमाध्यमांमुळे अशा विषयांना अकारण विचित्र वळण मिळत असून, समाजमाध्यमे समाजाची अडचण झाली आहेत, असे स्पष्ट मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी शनिवारी व्यक्त केले.
परममित्र प्रकाशनतर्फे विंग कमांडर (निवृत्त) विनायक डावरे यांच्या ‘अविस्मरणीय युद्धकथा’ या पुस्तकावरील चर्चेत ते बोलत होते. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवृत्त कमांडर विनायक आगाशे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ अभिनेते माधव वझे, लेखक डावरे आणि प्रकाशक माधव जोशी उपस्थित होते.
लढाई कोणालाच नको असते; पण, शांततेसाठी ती करावी लागते असे सांगून गोखले म्हणाले, ‘ १९६५च्या युद्धाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे सैन्य दलात समन्वय निर्माण झाला. आज सैन्यातील तरुणांमध्ये तसेच नागरिकांमध्ये उत्साह आहे. देश बदलत आहे.’
जोशी म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी जवान मृत्यूशी करार करतात. प्रत्येक क्षणी त्यांना धोक्याशी सामना करावा लागतो. आज देशाची परिस्थिती चमत्कारिक आहे. चांगले काम झाले तरी विरोध होतो. अशा गोंधळामुळे खरी परिस्थिती सामान्य नागरिकांसमोर येत नाही. देश अवघड परिस्थितीतून जात आहे.
सैन्य दलातील जवान आणि अधिकारी देशासाठी चारित्र्य घडवतात, अशी भावना डावरे यांनी व्यक्त केली. सैन्य दलाच्या मोहिमांवर चित्रपट निघाले तर नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असे वझे यांनी सांगितले. टंगेल पूर्व पाकिस्तान येथे ११ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्याने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची आठवण आगाशे यांनी जागवली.