पुणे: प्रवासी गाडीत जोडलेला जनरलचा डबा आता पार्सलच्या डब्यात रुपांतरित होणार आहे. रेल्वे बोर्डने तसा निर्णय घेतला असून, देशातील विविध कार्यशाळेत हे काम केले जाईल. ह्यासाठी प्रामुख्याने जुन्या डब्यांचे विशेषतः आयुर्मान संपलेले डबे वापरले जाणार आहे. या डब्यांतून पार्सलची वाहतूक केली जाईल. सध्या पार्सलच्या वाहतुकीसाठी पार्सलच्या विशेष डब्यांचा वापर केला जात आहे. डबे रुपांतर केल्याने नव्या पार्सल डब्यांचे उत्पादन करावे लागणार नाही. तसेच जुन्या डब्यांचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.
येणाऱ्या काळात रेल्वे प्रशासन जनरल डब्यांचा वापर कमी करण्यावर भर देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनरल डबे हे वातानुकूलित होतील. तसेच जुने डबे देखील पार्सलच्या डब्यांत रुपांतरित होणार असल्याने जुने डबे प्रवासी वाहतुकीतून आपसूकच बाहेर पडतील. कोविडच्या पहिल्या लाटेत जनरल डब्यांत कोणताही फारसा बदल न करता त्यातून माल वाहतूक झाली. आता मात्र जनरल डब्यांतील कम्पार्टमेंट काढून त्यातील खिडक्या बंद केल्या जातील. शिवाय, डब्यांच्या अंतर्गत रचनेत देखील बदल होईल.