लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे प्रशासनाने पुण्यासह देशातील विविध प्रमुख स्थानकांवरून स्पेशल व फेस्टिव्हल दर्जाच्या विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या. हे करत असताना प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून जनरल तिकीट विक्री व जनरल डबा बंद केला. केवळ आरक्षित तिकीटधारकांनाच आरक्षित डब्यांमधून प्रवास करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आता आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून रेल्वेने ही खबरदारी घेतली, मात्र डब्यांमधील वाढत्या गर्दीने कोरोनाला पुन्हा आमंत्रण तर मिळणार नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहेे.
रेल्वे प्रशासनाने जनरल तिकिटांची विक्री बंद केली. यामुळे जनरल डब्यातील प्रवास बंद झाला. रेल्वे जनरल डब्यांमध्ये आरक्षित तिकिटांची विक्री करून प्रवाशांना जनरल डब्यांमध्ये आरक्षित तिकिटावरून प्रवास घडवत आहे. यात रेल्वेचाच फायदा होत आहे. प्रवाशांना जास्तीचे पैसे देऊन तिकीट काढावे लागते. यात सर्वात कमी दर सेकंड सीटिंगच्या तिकिटाचा आहे. त्यामुळे जनरलसह सामान्य शयनयान डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे.
बॉक्स १
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या :
पुणे - मुंबई डेक्कन, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे - दानापूर एक्सप्रेस, पुणे - जम्मूतावी झेलम एक्सप्रेस, पुणे - दानापूर एक्सप्रेस. पुणे - वाराणसी ज्ञानगंगा एक्स्प्रेस, पुणे - जबलपूर एक्स्प्रेस, पुणे - जयपूर एक्स्प्रेस, पुणे - लखनऊ एक्स्प्रेस, पुणे - सतरंगाची, पुणे - नांदेड एक्स्प्रेस, राजकोट - सिकंदराबाद एक्स्प्रेस, यशवंतपूर - जयपूर, बंगळुरू - अजमेर, जोधपूर - बेंगळुरू, गांधीधाम - बेंगळुरू, अजमेर - म्हेसूर, मुंबई - नागरकोईल, आदी गाड्या धावत आहेत.
बॉक्स २
विक्रेत्यांची गर्दी जास्त;
पुणे स्थानकावर व पुण्याहून सुटणाऱ्या गाडीत विक्रेत्यांची संख्या जास्त आहे. यात बहुतांश विक्रेते हे अनधिकृत आहेत. आरपीएफ, जीआरपी त्यांच्यावर कारवाई करते खरी पण ती तितकी प्रभावी नसते. त्यामुळे अनधिकृत विक्रेते पुन्हा बिनधास्तपणे रेल्वेत फिरून आपला व्यवसाय करतात. जनरल, सामान्य शयनयान, वातानुकूलित तृतीय श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणीमध्येही या विक्रेत्यांचा मुक्त वावर असतो.
सर्वच गाड्यांना गर्दी जास्त :
पुणे - झेलम जम्मूतावी एक्सप्रेस, पुणे - पाटणा एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, पुणे - दानापूर एक्सप्रेस , मुंबई - नागरकोईल, आदी प्रमुख गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी जास्त आहे.
---------------------
रेल्वे स्थानकांवर व रेल्वे डब्यातील गर्दीवर नियंत्रण राहावे म्हणून रेल्वेने केवळ आरक्षित तिकीटधारकांनाच प्रवास करण्यास परवानगी दिली. त्याचाच भाग म्हणून जनरल डब्यांमध्ये आरक्षित तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे