पुणे : महापालिकेच्या नायडू रुग्णालयामध्ये दाखल असलेले परदेशी नागरिक हे ‘कोरोना’बाधित नसून, त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरच काय पण महाराष्ट्रात ‘कोरोना’चा संसर्ग झालेली एकही व्यक्ती नाही. त्यामुळे ‘कोरोना’ला घाबरून विनाकारण सर्वसामान्य नागरिकांनी मास्क घालून फिरण्याची अजिबात आवश्यकता नाही. डॉ. नायडू रुग्णालयामध्ये आजपर्यंत परदेशातून आलेल्या ज्या ८५ संशयित नागरिकांना तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी कोणालाही ‘कोरोना’चा संसर्ग झालेला नसल्याचे आढळून आल्याने, त्यांना तपासणीनंतर घरीही सोडण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत बाजारात ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारात उपलब्ध असलेले मास्क हे अतिशय बेसिक असून, त्याची किंमत केवळ दीड ते दोन रुपये एवढी आहे. मात्र ‘कोरोना’च्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण्याची अफवा पसरविल्यामुळे हे दीड दोन रुपयांचे मास्कही आजमितीला वीस ते पंचवीस रुपयांना विकले जात आहेत. मुळात हे मास्क अतिशय बेसिक असून, त्याच्या वापराने नगण्य असाच संसर्ग रोखला जाऊ शकतो. ‘कोरोना’सारखा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी जे ‘एन-९५’ या मास्कची आवश्यकता आहे. हे मास्क सध्या बाजारात कुठेच नसून, केवळ आरोग्य प्रशासनाने हे मास्क आपल्या रुग्णालयात, म्हणजे जेथे ‘कोरोना’संशयित रुग्ण दाखल केले जात आहे. तेथील रुग्ण हाताळणाऱ्या डॉक्टर व संबंधित यंत्रणेकरिता उपलब्ध करून दिलेले आहेत. ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून जी मास्क खरेदी केली जात आहे ती अनावश्यक बाब असून, या मास्कपेक्षा खबरदारी घेणाऱ्या व्यक्तीने स्वत:कडील रुमालाचा वापर केला तरी खूप आहे. बाजारात उपलब्ध असलेले हे मास्क एकदा वापरल्यावर फे कून देण्याच्या दर्जाचे आहेत़ त्यामुळे हे मास्क वापरल्यावर संबंधित व्यक्तीकडून रस्त्यावर कुठेही टाकले जातात़ परिणामी त्या व्यक्तीचा केवळ सर्दी खोकल्याचा संसर्ग मात्र पसरत जाण्याची भीती आहे़ रुग्णांना जे वैद्यकीय सेवा देतात, रुग्ण हाताळतात यांनीच फक्त मास्क वापरणे अपेक्षित आहे़ सर्वसामान्य नागरिकांनी विनाकारण मास्क वापरू नये़ सर्दी खोकला झाला तर खबरदारी म्हणून रूमाल वापरा पण घाबरून जाऊ नका असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे़
सर्वसामान्य नागरिकांना मास्कची अजिबात आवश्यकता नाही : महापालिका आरोग्य विभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 7:24 PM
‘कोरोना’चा एकही रुग्ण पुण्यात नाही : घाबरू नका, पण खबरदारी घ्या
ठळक मुद्दे‘कोरोना’सारखा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी जे ‘एन-९५’ या मास्कची आवश्यकता