पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी किमान ३३% गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात आली आहे.
या पेपरमध्ये किमान ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. याबद्दलचे परिपत्रक आयोगाने वेबसाईटवर टाकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पेपर क्वालिफाईंग करण्याची मागणी होत होती. युपीएससीच्या धर्तीवर राज्यसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांमधून स्वागत केले जात आहे.
हा निर्णय कधीपासून लागू होणार-
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.